भरधाव कारने थिवीतील दोन दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याने या झालेल्या भीषण अपघातात दिव्यांश सिंग (रा. उत्तर प्रदेश) हा ठार झाला, तर सचिन चाचिया (रा. हरियाणा) हा गंभीर जखमी झाला. ही घटना थिवी-बार्देश येथे काल घडली
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन अतिवेगाने थिवीच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींवर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले.
उपचारादरम्यान एका जखमी दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या जखमीवर सध्या उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या बेफिकिरीमुळेच हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुढील तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.