>> बँकांचा ४०० कोटी कर्ज देण्यास नकार
>> २० हजार कर्मचार्यांवर टांगती तलवार
कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेज कंपनीला ४०० कोटी रुपयांचे अंतरिम कर्ज देण्यास बँकांनी नकार दिल्याने काल बुधवारी मध्यरात्रीपासून आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल मध्यरात्रीनंतर जेट एअरवेजची सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित झाली आहेत. जेट एअरवेजच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जेट एअरवेजने गाशा गुंडाळल्याने २० हजार कर्मचार्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
जेट एअरवेजचा कारभार सुरू ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसाहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प होणार आहे. गेल्या डिसेंबरपासून जेट एअरवेजच्या विमानांच्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली होती.
जेटच्या १२३ विमानांच्या ताफ्यांपैकी केवळ पाचच विमाने कार्यरत होती. याशिवाय, जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच ठप्प झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १०.३० वाजता जेटच्या विमानाने शेवटचे उड्डाण घेतले.
कंपनीत स्टेट बँकेने हिस्सा वाढविताना, १,५०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात ३०० कोटींचाच वित्तपुरवठा झाल्याने जेटची देशांतर्गत उड्डाणांची संख्या दिवसागणिक कमी होत आली होती. सुरुवातीला पूर्वेत्तर भारत तर नंतरच्या टप्प्यात दक्षिणेतील उड्डाणे कमी करण्यात आली होती. मध्यंतरी देणी थकल्याबद्दल इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जेटचा तीन वेळा इंधन पुरवठाही खंडित केला होता.
जेटच्या सर्व आशा स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या बँकांच्या समूहावर एकटवल्या होत्या. या बँकांकडून ४०० कोटींचा निधी मिळण्याची अपेक्षा जेट एअरवेजला होती. मात्र, ती फोल ठरली. जेट एअरवेज ही मे २०१४ पासून बंद पडलेली सातवी भारतीय विमान कंपनी ठरली आहे. जेट एअरवेज संकटात सापडल्याने २० हजार कर्मचार्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचार्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंदोलन केले होते.
दरम्यान, जेट एअरवेज कंपनीच्या ताफ्यातील भाड्याची विमाने घेण्यासाठी स्पर्धक स्पाईस जेटने उत्सुकता दर्शविली आहे. तर अन्य स्पर्धक इंडिगोने देशांतर्गत उड्डाणांची संख्या गेल्या काही दिवसात वाढविली आहे.

