Home Featured जनगणनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू

जनगणनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू

0

डिजिटल पद्धतीचा अवलंब; 16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात घरोघरी माहिती संकलित करणार

राज्यात डिजिटल पद्धतीच्या जनगणनेच्या पहिला टप्प्याला आज (दि. 1 एप्रिल) पासून प्रारंभ होत आहे. 1 ते 15 एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यात घरांची, घरगुती सुविधांची जनगणना पूर्ण केली जाणार आहे. 1 ते 15 एप्रिल या काळात नागरिक जनगणना पोर्टलवर स्वतःच्या घरांची आणि घरगुती सुविधांची नोंदणी करू शकतात. त्यानंतर 16 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत घरोघरी लोकसंख्या गणना व इतर माहितीची गणना केली जाणार आहे, अशी माहिती जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका चेष्टा यादव (आयएएस) यांनी पर्वरी येथे सचिवालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील जनगणनेसाठी 422 निरीक्षक आणि 2467 नोंदणी कर्मचारी मिळून एकूण 3086 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणना नोंदणी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा समावेश आहे. जनगणेनातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे, असेही यादव यांनी सांगितले.

जनगणनेसाठी प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. जनगणना कर्मचारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहितीचे संकलन करणार आहेत. निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा सीएनएमएस पोर्टलच्या माध्यमातून घेतला जाणार आहे, असेही चेष्टा यादव यांनी सांगितले.

राज्यातील तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, 26 उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्याची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील जनगणनेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील दोन अधिकारी निरीक्षक आणि जनगणना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. राज्यातील जनगणना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 6 मास्टर आणि 50 फिल्ड ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले.

घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्या ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना कर्मचाऱ्याची सविस्तर माहिती मिळू शकते. पंचायत आणि नगरपालिका यांना जनगणनेबाबत जनजागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही यादव यांनी सांगितले. यावेळी नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना आणि श्वेता नंदवाना यांची उपस्थिती होती.

नागरिकांना 33 प्रश्न विचारले जाणार
जनगणनेसाठी नागरिकांना 33 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यात विविध प्रकारच्या घरगुती माहितीचा समावेश आहे. या जनगणमध्ये निवासाची माहिती, घरातील व्यक्ती, शिक्षण, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, जात आदी माहितीचे संकलन प्रश्नांच्या माध्यमातून केले जाणार आहे, असेही चेष्टा यादव यांनी सांगितले.

15 एप्रिलपर्यंत स्वयंनोंदणी प्रक्रिया

राज्यात 1 ते 15 एप्रिल ह्या काळात जनगणनेंतर्गत स्वयंनोंदणी प्रक्रिया होणार आहे.
ुुु.लशर्पीीीळपवळर.र्सेीं.ळप या जनगणना पोर्टलवर स्वतःच्या घराची माहिती नागरिक भरू शकतात.
पोर्टलवर माहिती अपलोड केल्यानंतर त्या नागरिकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर 11 अंकांचा समावेश असलेला आयडी क्रमांक प्राप्त होणार आहे.

जनगणना कर्मचारी घरी आल्यानंतर 11 क्रमांकाचा आयडी दाखवावा लागेल.
सदर माहिती योग्य असल्याची तपासणी केल्यानंतर जनगणना अधिकारी माहिती पुन्हा पोर्टलवर अपलोड करणार आहे.

या पोर्टलवर 16 भाषांचा समावेश असून त्यात कोकणी भाषेचा सुध्दा समावेश आहे.
हा पोर्टल 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत घराच्या नोंदणीसाठी खुला असेल.

दोन टप्प्यांत पार पडणार जनगणना
जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची व घरगुती सुविधांची माहिती घेतली जाईल. त्यात पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, इंटरनेट, तसेच घरातील मालमत्ता जसे टीव्ही, वाहने, फ्रीज यांचा समावेश असेल.
दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येशी संबंधित माहिती जसे की नाव, वय, शिक्षण, व्यवसाय, भाषा, धर्म, स्थलांतर आदी तपशील नोंदवले जातील.

माहिती गोपनीय ठेवली जाणार
प्रशासनाच्या माहितीनुसार, जनगणनेत दिलेली सर्व माहिती जनगणना कायदा 1948 अंतर्गत पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. वैयक्तिक माहिती कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेशी शेअर केली जात नाही, तर केवळ एकत्रित आकडेवारीच प्रसिद्ध केली जाते.

चुकीची माहिती दिल्यास दंड
जनगणनेत सहभागी होणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिती देणे आवश्यक असून चुकीची माहिती देणे किंवा सहकार्य न करणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. अशा प्रकरणात दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. जनगणना प्रक्रियेसाठी शिक्षक, सरकारी कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.