इस्रायलने मंगळवारी इराणच्या अल्बोर्ज प्रांतात भीषण हवाई हल्ले केलेे. इस्रायलच्या या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी इस्रायलने काही महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. तसेच इराणने देखील इस्रायलच्या तेल अवीव शहरात क्षेपणास्त्र हल्ले केले आणि त्यांची आयरन डोम ही यंत्रणा नष्ट केली.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या वायव्य भागात असलेल्या अल्बोर्ज प्रांतात इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नेमके कुणाला लक्ष्य करण्यात आले, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय, इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही हवाई हल्ले करण्यात आले. यात डोंगराळ भागातील एक शस्त्रास्त्रे साठवण्याचा डेपो आणि काही निवासी भागांचाही समावेश असल्याचे समजते.
काल इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाचा 39 वा दिवस होता दिवसागणिक दोन्ही देशांमधील हल्ले अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. एकीकडे इराण इस्रायलसह आखाती देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे.