इस्रायलने लेबनॉनमध्ये इराणच्या हिजबुल्ला मिलिटंट्स ग्रुपवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणने बुधवारी 8 एप्रिल रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. दरम्यान अमेरिकेने जागतिक तेल वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा जलमार्ग तातडीने खुला करण्याची मागणी इराणकडे केली आहे. लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात झालेला युद्धविराम करार टिकणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. या कराराची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता मध्य बैरूतच्या दाट लोकवस्ती असलेल्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांवर हवाई हल्ले केले. इस्रायलने 10 मिनिटांत हिजबुल्लाच्या 100 हून अधिक ठिकाणं लक्ष्य करत हल्ला केला.