गोवा विधानसभेचे सभापती आमदार अपात्रता प्रकरणी योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.
गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने प्रतिवादींना बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयातील अपात्रता याचिकेवर भाष्य करण्यास नकार दिला. आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सभापती हेच योग्य अधिकारी आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने योग्य सतर्कता बाळगण्याची सूचना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.