श्रीसंतने निवडला सर्वकालीन वनडे संघ

0
160

टीम इंडियाचा माजी द्रुतगती गोलंदाज एस. श्रीसंतने आपल्या सर्वकालीन वनडे संघाची निवड केली आहे. संघाचे नेतृत्व भारताचा माजी यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीकडे सोपविले आहे.

श्रीसंतने आपल्या संघात स्वतःसह एकूण ६ भारतीयांना स्थान दिले आहे. त्याने स्वतःची निवड संघाचा १२वा खेळाडू म्हणून केली आहे. अंतिम अकरा संघात श्रीसंतने एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिले नाही. श्रीसंतने निवडलेल्या या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व डावखुरा फलंदाज सौरव गांगुली यांना सलामीवीर म्हणून पसंती दिली आहे. तिसर्‍या स्थानी वेस्ट इंडीजचा विक्रमादित्य फलंदाज ब्रायन लाराला निवडले आहे. चौथ्या क्रमावर टीम इंडियाचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे.
मध्यफळीत पाचव्या स्थानी श्रीसंतने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्सची निवड केली आहे. तर सहाव्या स्थानी भारताला दोन विश्वचषके जिंकून देणार्‍या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पसंती दिली आहे. अष्टपैलू म्हणून श्रीसंतने संघात भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंह व दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला स्थान दिले आहे.

श्रीसंतने निवडलेला सार्वकालीन वनडे संघ ः सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली (कर्णधार), ब्रायन लारा, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युवराज सिंह, एमएस धोनी (यष्टिरक्षक), जॅक कॅलिस, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, ऍलन डोनाल्ड आणि एस श्रीसंत (संघातील १२वा खेळाडू).