उद्या व शुक्रवारपासून गोव्यातून विशेष ट्रेन्स

0
144

भारतीय रेल्वेमार्फत १२ मेपासून सुरू करणात येणार्‍या खास रेल्वे गाड्यांपैकी दोन रेल्वे गाड्या गोव्यातून वाहतूक करणार आहेत. त्यातील एक रेल्वेगाडी नवी दिल्ली ते मडगाव दरम्यान धावणार आहे. तर, दुसरी रेल्वेगाडी नवी दिल्ली ते तिरूअनंतपुरम दरम्यान धावणार आहे. या गाडीला मडगाव रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली ते तिरूअनंतपुरम ही रेल्वेगाडी १३ मेपासून धावणार आहे. ही रेल्वेगाडी मंगळवार, बुधवार आणि रविवारी धावणार आहे.

तर, तिरूअनंतपुरम ते नवी दिल्ली ही गाडी १५ मेपासून धावणार आहे. ही रेल्वेगाडी मंगळवार, गुरुवार, शुक्रवारी धावणार आहे.
या गाडीला एर्नाकुलम, मंगलोर, मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा येथे थांबा देण्यात आला आहे. दिल्ली ते मडगाव ही रेल्वेगाडी १५ मेपासून धावणार आहे. ही रेल्वेगाडी शुक्रवार, शनिवारी धावणार आहे. तर, मडगाव ते दिल्ली ही रेल्वेगाडी १७ मेपासून धावणार आहे. ही रेल्वेगाडी सोमवार, रविवारी धावणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांना रत्नागिरी, पनवेल, सुरत, वडोदरा, कोटा येथे थांबा देण्यात आला आहे.

मडगावहून दुसरी श्रमिक
ट्रेन काश्मीरला रवाना

गोव्यात अडकून पडलेल्या जम्मू-काश्मीरमधील १२०० लोकांना घेऊन खास श्रमिक रेलगाडी काल संध्या. ७ वा. मडगाव रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आली. या लोकांमध्ये गोव्यात विविध ठिकाणी दुकाने, समुद्रकिनार्‍यांवरील शॅक व अन्य आस्थापनांत काम करणार्‍या व व्यावसायिक लोकांचा समावेश होता.

देशातील कोरोना मृतांची
संख्या गेली २२०६ वर
>> बाधितांची संख्या ६७,१५२

देशात सोमवारी सकाळी ८ वा. पर्यंत त्याआधीच्या २४ तासांत कोरोनामुळे ९७ जण मरण पावले असून एकूण कोरोना बळींची संख्या २२०६ एवढी झाल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत देशभरात एकूण ४२१३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या ६७,१५२ वर पोचली आहे. आतापर्यंत यापैकी २०,९१७ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्याचे प्रमाण ३१.१५ टक्के एवढे असल्याचे अगरवाल म्हणाले. देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या प्रसारात वाढ झाल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र हा प्रकार सामाजिक प्रसाराच्या पातळीवर पोचू नये याची काळजी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.