>> आमदार नीलेश काब्राल यांचा इशारा
गोंयचो आवाज संघटनेच्या सभेत प्रादेशिक आराखड्याचा गैरफायदा उठवून जमीन रूपांतर केल्याचा वक्त्यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा आहे. येत्या ५ मे पर्यंत संबंधितांनी लेखी स्वरूपात माफी न मागितल्यास आरोप करणार्यांच्या विरोधात बदनामी प्रकरणी मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करणार आहे. तसेच अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असा इशारा कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.
लोटली येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रश्नावर गोंयचो आवाज या संघटनेच्या पदाधिकार्यांशी थेट चर्चेची तयारी आहे. लोटलीतील सर्वे क्रमांक १६१-१ मधील जमीन रूपांतरित केल्याचा आरोप दिशाभूल व बदनामी करणारा आहे. दोन वर्षांपूर्वी उद्योग स्थापन करण्यासाठी सदर जमीन विकत घेतली होती. ही जमीन खासगी औद्योगिक विभागात येत आहे. या जमिनीच्याजवळील जागा सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी ताब्यात घेतलेली आहे. या जमिनीचे ‘सेटलमेंट’ मध्ये रूपांतर करून आपणाला कोणता फायदा मिळणार आहे, असा सवाल काब्राल यांनी यावेळी केला. नियोजित विकासासाठी प्रादेशिक आराखडा, पीडीएची नितांत गरज आहे. प्रादेशिक आराखडा, पीडीएसंबंधी काही तक्रारी असू शकतात. या तक्रारी चर्चेच्या माध्यमातून सोडविल्या जाऊ शकतात, असेही काब्राल यांनी सांगितले.
हेल्थ ऍक्टच्याखाली घरांना वीज व पाणी कनेक्शन दिले जात असल्याने अनियोजित विकासात वाढ होत आहे. पंचायत किंवा सरकारी यंत्रणेची परवानगी नसताना घरांचे बांधकाम केले जाते. हेल्थ ऍक्टखाली आरोग्य अधिकार्यांकडे अर्ज केल्यानंतर घरांना वीज व पाणी कनेक्शन दिले जात आहे. हे प्रकार बंद होण्याची गरज आहे. या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून हेल्थ ऍक्टखाली कनेक्शन वितरण बंद करण्याची विनंती करणार आहे, काब्राल म्हणाले.