बार्देश-तिसवाडी तालुकास्तरावरील निमंत्रितांच्या १५ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद तिसवाडी तालुक्याच्या माधवन जी. (इलो १३६७) याने प्राप्त केले. त्याने सातपैकी पाच सामने जिंकताना दोन बरोबरींसह एकूण ६ गुणांची कमाई केली. बार्देश तालुक्याचा मंदार प्रदीप लाड दुसर्या क्रमांकावर राहिला. ‘द आर्डी स्कूल ऑफ सांगोल्डा बार्देश’ यांनी बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने सांगोल्डा येथील बेला व्हिस्टा येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धा समाप्तीनंतर माधवन व मंदार यांचे समान ६ गुण झाले होते. परंतु, बुचोल्झ टायब्रेकरच्या अवलंबानंतर माधवन (२९.००) मंदारपेक्षा (२५.५०) सरस ठरल्याने माधवनला पहिला क्रमांक देण्यात आला.
माधवनने २००० रुपयांची कमाई केली. तर मंदारला १५०० रुपये प्राप्त झाले. या स्पर्धेत बार्देश तालुक्यातील ३२ व तिसवाडी तालुक्यातील १८ खेळाडूंचा समावेश होता. यात १० फिडे मानांकित खेळाडू होते.
स्पर्धेचे मुख्य लवाद म्हणून अरविंद म्हामल यांनी काम पाहिले. त्यांना अविनाश मालवणकर याचे साहाय्य लाभले. बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वास पिळणकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी आर्डी स्कूलच्या प्रा. कृपा देसाई (स्पर्धा संयोजक), मुख्य लवाद अरविंद म्हामल, शाळेचे शारीरिक शिक्षक विशाल पालयेकर (आयोजन सचिव), सागचे प्रशिक्षक व उपमुख्य लवाद अविनाश मालवणकर, आर्डी स्कूलच्या श्रीमती बिन्नी, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. सुशांत धुळापकर, खजिनदार रामचंद्र परब आदी उपस्थित होते.
अन्य निकाल ः तिसरे स्थान ः प्रतीक बोरकर, तिसवाडी (१ हजार रुपये), चौथे स्थान ः विनायक थेवर, तिसवाडी (५०० रुपये), पाचवे स्थान ः अवनीश सावंत, तिसवाडी (५०० रुपये). विशेष बक्षिसे ः खुला गट ः अंडर ७ ः समर्थ धुळापकर (बार्देश), अंडर ९ ः प्रथमेष मालवणकर (बार्देश), ११ वर्षांखालील ः जॉय काकोडकर (तिसवाडी), आर्डी स्कूलमधील सहभागी ः देवेन छाब्रा व कैरा सिंग.