Home बातम्या करार नाकारल्यास ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करू

करार नाकारल्यास ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करू

0

ट्रम्प यांनी दिली इराणला धमकी

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानात बैठका सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार नाकारल्यास ऊर्जा प्रकल्प नष्ट करू असा इशारा दिला आहे. इस्लामाबाद येथे सुरू होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेची दुसरी फेरी आज सोमवारी इस्लामाबाद येथे नियोजित आहे. तथापि, या फेरीपूर्वीच, इराणने चर्चेच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत इराणविरुद्धची नौदल नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत चर्चेसाठी पाकिस्तानात कोणतेही शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही असे स्पष्ट शब्दांत इराणने सांगितले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य केले जाईल असा इशाराही इराणने दिला आहे. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरू ठेवल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आरआयजीसी) स्पष्ट केले आहे.

भारताची 14 जहाजे रोखली
अमेरिका आणि इराणच्या दुतर्फा नाकेबंदीदरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने शनिवारी भारतात येणारे 14 टँकर होर्मुझमध्ये रोखले व दोनवर गोळीबार केला. या घडामोडीनंतर इराणने 13 टँकर रोखले. त्यांना पर्शियन आखातात थांबण्यास सांगितले. या घडामोडीनंतर भारताने नवी दिल्लीत इराणी राजदूत मोहम्मद फथालींना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला. भारत त्यांना सुरक्षित आणण्यासाठी इराणशी समन्वय साधत आहे. यादरम्यान, इराणने म्हटले की जोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत होर्मुझवर नियंत्रण ठेवेल.

आज चर्चेची शक्यता

अमेरिका आणि इराण दरम्यान आज सोमवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. मात्र इराणने आपले प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांतील युद्धविराम बुधवारी संपणार आहे.