नवोदय विद्यालयानजीक घडली घटना
येथील नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या नदीमध्ये 27 वर्षीय युवक बुडल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) सायंकाळी घडली. संबंधित युवक आपल्या मित्रांसमवेत नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र दुर्दैवाने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर रात्री सुमारे साडेआठ वाजता शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मडगाव घोगळ येथील महाबळी पटेल (वय 27) हा शनिवारी कार्यक्रमानिमित्त वाळपई येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता. रविवारी सायंकाळी नवोदय विद्यालयामागील नदीमध्ये तो मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेला असता अचानकपणे पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी तात्काळ नातेवाईकांना दिली. तसेच अग्निशामक दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत महाबळी पटेल याचा शोध सुरू केला. मात्र, रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रयत्न करूनही त्याचा शोध लागला नव्हता.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी तरुण बुडाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आहे. त्यामुळे तो चिखलात रुतून अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.
आज (सोमवारी) सकाळी पुन्हा एकदा शोध कार्य हाती घेण्यात येणार आहे.