जीवन संस्कार- 12
- प्रा. रमेश सप्रे
व्यक्तीचा विकास योग्य दिशेनं नि उद्देशानं होण्यासाठी जे संस्कार घडवले जातात ते अक्षरशः जीवनव्यापी असतात. म्हणजे सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व सजीव-निर्जीव वस्तूंकडून, प्रत्येक कृतीतून, घटना-प्रसंगातून संस्कार घडतच असतात. यासाठी आपण मात्र ग्रहणक्षम नि संवेदनक्षम असावं लागतं.
संस्कार ही एक प्रक्रिया (प्रोसेस) आहे; एखादी बनवलेली वस्तू (प्रॉडक्ट) नव्हे. म्हणून ती बाजारात मिळत नाही आणि कारखान्यात तयार करता येत नाही. ‘संस्कार’ या शब्दाच्या पोटात दोन शब्द आहेत- ‘सम्’ आणि ‘कृ’- याचा अर्थ कल्याणकारी कृती. व्यक्तीचा विकास योग्य दिशेनं नि उद्देशानं होण्यासाठी जे संस्कार घडवले जातात किंवा घडवावे लागतात ते अक्षरशः जीवनव्यापी असतात. म्हणजे सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व सजीव-निर्जीव वस्तूंकडून, प्रत्येक कृतीतून, घटना-प्रसंगातून संस्कार घडतच असतात. यासाठी आपण मात्र ग्रहणक्षम (रिसेप्टिव्ह) नि संवेदनक्षम (सेन्सिटिव्ह) असावं लागतं.
अगदी लहान वयापासून असे संस्कार घडवून घेण्याची मुलांची क्षमता पालक-शिक्षकांनी वाढवली पाहिजे. जीवनसंस्कारच माणसाच्या पिल्लाला (मुलाला) माणूस बनवतात. हे घडलं नाही तर हैवान-सैतान निर्माण होतात.
संस्कार कशामुळे घडतात किंवा कोण घडवतात? जीवनाला स्पर्श करणारी कोणतीही गोष्ट किंवा अनुभव आपल्या मनावर संस्कार घडवू शकतो. काळ (टाइम) आणि जीवन (लाइफ) हे जणू समानार्थी शब्द आहेत. काळ असतोच असतो. तो वाहत नसतो तर त्याच्यामधून सारं विश्व वाहत असतं. आपण ‘काळाचं व्यवस्थापन’ (टाइम मॅनेजमेंट) हा शब्दप्रयोग सहज वापरतो. पण विचार केला तर लक्षात येतं की काळाचं व्यवस्थापन करणारे आपण कोण ‘महाकाळ’ आहोत? तसं पाहिलं तर काळच विश्वातील साऱ्या घटनांचं नियोजन, नियंत्रण, व्यवस्थापन करत असतो. आपण करू शकतो ते उपलब्ध काळानुसार आपल्या गोष्टींचं व्यवस्थापन- हेही व्यवहारात खूप उपयोगी पडतं.
काळ मोजण्यासाठी घटिकायंत्र, घटिकापात्र, घड्याळ अशी अनेक यंत्रं आपण बनवली आहेत. यांची एक मर्यादा आहे. ही यंत्रं फक्त काळ दाखवतात. ‘किती वाजलेयत?’ हे सांगून अनेक वेळा सावध करतात. बस, एवढाच त्यांचा उपयोग. ठरलेल्या वेळेपूर्वी किंवा वेळेकर येण्यासाठी या कालमापन यंत्राचा फक्त उपयोग होतो. वेळेवर येण्याचा मनावर संस्कार मात्र ही कालमापन यंत्रं घडवू शकत नाहीत. याबाबतीत आपण अगदी त्या अडाणी माणसासारखे असतो, ज्याच्या मनगटावर घड्याळ असतं. ‘किती वाजले?’ विचारल्यावर तो म्हणतो, ‘तुम्ही बघा नि मलाही सांगा किती वाजलेत ते!’ असो.
काळ दर्शवणारी आणखी साधनं म्हणजे पंचांगं, दिनदर्शिका नि हल्ली मोबाईल. इंग्रजी दिनदर्शिकेत तारखा असतात, तर आपल्या पंचांगात असतात तिथी. वार दोन्हीकडे असतात नि गंमत म्हणजे ते रविवार (सन्डे)पासून शनिवार (सॅटर्डे)पर्यंत क्रमानं असतात. तिथींचेही काही संकेत तसेच संस्कार असतात. त्यावर सहचिंतन करूया. अर्थातच मुक्त चिंतन.
एका मुलाचा प्रश्न- द्वितीयेपासून चतुर्दशीपर्यंतच्या तिथी या संख्यावाचक आहेत. मग पहिली तिथी ‘प्रथमा’ का नाही? प्रतिपदा कशाला?
‘संस्कृत’ ही कृत म्हणजे चिंतनातून घडवलेली भाषा आहे. निसर्गाच्या ओघात उत्क्रांत (इव्हॉल्व) झालेली भाषा नाही. जवळ जवळ सर्व शब्द घडताना त्यांच्यावर ऋषीमुनींच्या चिंतनाचे संस्कार घडले आहेत. कधी ते वस्तुस्थिती दाखवणारं चिंतन असेल, तर कधी त्या महामानवांच्या उत्स्फूर्त प्रतिभेतून व्यक्त झालेलं चिंतन असेल.
‘प्रतिपदा’ या शब्दाचा एक अर्थ आहे विरुद्ध दिशेनं (प्रति) टाकलेलं पाऊल (पद). किती मार्मिक शब्द आहे हा- प्रतिपदा! शुक्ल पक्षात अमावस्येनंतर विरुद्ध दिशेनं (अबाउट टर्न) टाकलेलं पहिलं पाऊल ते प्रतिपदा. शुद्ध प्रतिपदा! तसेच पौर्णिमेनंतर विरुद्ध दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे कृष्ण प्रतिपदा. पाऊल अर्थातच चंद्राचं. अशा प्रकारे शुद्ध प्रतिपदा चंद्राच्या वाढणाऱ्या प्रकाशाचं प्रतीक आहे, तर वद्य प्रतिपदा चंद्राच्या कमी होणाऱ्या (अंधाराकडे नेणाऱ्या) प्रकाशाचं प्रतीक आहे.
यासंदर्भात ‘रामचरितमानस’ लिहिणाऱ्या संत गोस्वामी तुलसीदासांनी एक मार्मिक प्रश्न विचारलाय- एकाच वेळी तो प्रश्न भौगोलिक किंवा भौतिक आहे तसाच तो आध्यात्मिकही आहे. प्रश्न असा आहे-
शुक्ल (शुद्ध) नि कृष्ण (वद्य) पंधरवड्यात आकाशात प्रकाशणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाचं प्रमाण सारखंच आहे, मग एका पंधरवड्याला शुद्ध नि दुसऱ्या पंधरवड्याला वद्य (अशुद्ध) पक्ष का म्हणतात?
यावर तुलसीदासांचं उत्तरही मार्मिकच आहे- ‘दोन्ही पक्षातील (पंधरवड्यातील) चंद्रप्रकाशाचं प्रमाण अगदी सारखं असलं तरी शुक्ल (शुद्ध) पक्षात अमावस्येकडून पौर्णिमेचा प्रवास करताना प्रकाश वाढत जातो. याउलट वद्य पक्षात पौर्णिमेकडून अमावस्येकडे जाताना चंद्रप्रकाश कमी होत जातो.’ फार छान उत्तर आहे हे! या साऱ्या प्रकाशाची दिशा बदलण्याचे काम प्रतिपदेला घडते म्हणून तिला ‘प्रतिपदा’ म्हणतात.
आठवा पाहू तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरचा संस्कृत भाषेतला संकल्प-
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।
ही राजमुद्रा जी प्रतिपदेच्या चंद्रमाप्रमाणे सतत विकसित होत आहे, आणि जी साऱ्या विश्वाला वंदनीय आहे (किंवा सारं विश्व जिला वंदन करत आहे), ती शहाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठी कार्यरत (विराजमान) आहे.
इथंही (शुक्ल) प्रतिपदेचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वीच्या अनेक शतकांचा पराभवाचा इतिहास पलटवून हिंदवी साम्राज्याची स्थापना केली, हीच ती प्रतिपदा (चंद्रलेखा).
शशिकला, चंद्रलेखा (फेसेज् ऑफ द् मून) एकूण सोळा आहेत. अमावस्येच्या शून्यावस्थेपासून पौर्णिमेच्या पूर्णावस्थेपर्यंत असणाऱ्या या सोळा चंद्रकला पूर्ण विकासाचं, पूर्णत्वाचं प्रतीक आहे. म्हणून पूर्वी सोळा आण्यांचा एक बंदा रुपया होता. असो.
प्रतिपदेचा संदेश नि संस्कार आहे कधीही निराश न होण्याचा. कोणत्याही परिस्थितीत अयोग्य दिशा बदलून प्रगतीकडे, उत्कर्षाकडे, उद्धाराकडे प्रवास चालू ठेवण्याचा सकारात्मक संस्कार!
प्रतिपदा ः ही पहिली तिथी असल्याने एकत्वाचा, अद्वैताचाही संस्कार घडवते. काही प्रतिपदा तर पर्व बदलणाऱ्या क्रांतिकारक तिथी असतात. जशी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा किंवा संसार पाडवा). तर कार्तिक शुद्ध प्रतिपदा- दिवाळीतला पाडवा किंवा बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाची- शेतकऱ्यांची प्रतिपदा. असो.
द्वितीया ः ही केवळ दुसरी तिथी नाही तर प्रपंचातील, संसारातील, जीवनातील द्वैताचं स्मरण करून देणारी तिथी आहे. द्वितीयेचा मुख्य सण आहे भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणजेच यम नि त्याची बहीण यमी यांच्यातील घट्ट नात्याची तिथी. भाऊ-बहीण हे देहानं द्वैतात (द्वितीयेत) असले तरी आतून, आत्म्याच्या पातळीवर एकमेकांशी जोडलेलेच असतात. द्वैतातलं अद्वैत ते हेच!
आपले सण-समारंभही तिथींशी जोडलेले आहेत. प्रत्येक सणाचा साजरा करण्याचा विधी, धार्मिक अर्थ वेगळा असला तरी सर्वत्र आनंदाचं वितरण करण्याचं, सर्व भेद, विषमता विरघळून टाकण्याचं व्रतच जणू सर्वजणांनी आपल्याला सुचवलेलं असतं.
आपण प्रपंचात, जीवनात येतो तेच द्वैतातील अद्वैतातून. स्त्री-पुरुष किंवा माता-पिता या दोन व्यक्ती देहाच्या पातळीवर दोन असल्या तरी त्यांच्या संगमातून (समागमातून) निर्मिती होते ती अद्वैताचीच. जुळी मुलं झाली तरी ती प्रत्येकजण पूर्ण ‘एक’ असतात. अद्वैताचंच प्रतीक असतात. हे त्या ऋषींच्या शांतिपाठातही व्यक्त होतं-
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांन्तिः शान्तिः शान्तिः॥
एकप्रकारे ही अद्वैताचीच प्रार्थना आहे. जीवनात मात्र द्वेताचा (द्वितीयेचा) अनुभव घ्यायचा असतो.
ॐ सह नाववतु, सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शांन्तिः शान्तिः शान्तिः॥