मद्य तस्करी प्रकरणी गोवा अबकारी निरीक्षकाला अटक
कर्नाटक अबकारी विभागाची कागोडू येथे मोठी कारवाई
गोवा बनावटीच्या मद्याची कर्नाटकात मद्य तस्करी केल्या प्रकरणात गोवा अबकारी विभागाचे निरीक्षक प्रमोद विश्वनाथ जुवेकर (रा. बेतुल-केपे) याला कर्नाटक अबकारी विभागाने अटक केली असून, त्याच्याकडून 138.06 लीटर मद्य जप्त केले आहे. दरम्यान, गोवा अबकारी विभागाने मद्य तस्करी प्रकरणात अटक केलेल्या प्रमोद जुवेकर याला निलंबित करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अबकारी खात्याच्या सूत्रांनी दिली.
गोव्यातून कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी केली जात आहे. काणकोण तालुक्याच्या सीमेवरून जंगल भागातून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्य तस्करीचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मद्य तस्करीवरील कारवाईकडे लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या अबकारी विभागाने गोवा बनावटीच्या मद्याची आपल्या राज्यात तस्करी रोखण्यासाठी कारवाईचे सत्र सुरू केले असून, गोव्यातून कर्नाटकात बेकायदा नेण्यात येणारे मद्य जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
शिमोगा जिल्ह्यातील सागर शहरातील कागोडू येथे गेल्या गुरुवारी कर्नाटक अबकारी विभागाने केलेल्या कारवाईत प्रमोद जुवेकर चालवत असलेल्या जीए-08-एफ-3312 या कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली. सागर अबकारी विभागातील कागोडू येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतात ही कार ताब्यात घेण्यात आली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्य साठा असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. अबकारी विभागाच्या पथकाने कारगाडीची तपासणी केली असता कारगाडीतून 138.06 लीटर गोवा बनावटीचे मद्य असल्याचे आढळून आले. या प्रकरणी कर्नाटक उत्पादन शुल्क कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित प्रमोद जुवेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
प्रमोद जुवेकरचे निलंबन
गोवा अबकारी विभागाने कर्नाटकात मद्य तस्करी प्रकरणात अटक केलेल्या अबकारी निरीक्षक प्रमोद जुवेकर याला निलंबित करून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त अबकारी आयुक्त चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.