‘अक्षयपात्र’द्वारे रुग्ण, कैद्यांनाही आहार पुरवण्याचा मानस

0
4

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; साळगाव येथे अक्षयपात्रच्या स्वयंपाकघराचे उद्घाटन

अक्षयपात्र’च्या स्वयंपाकघराचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले. साळगाव येथील आपत्ती आश्रय केंद्रात हे स्वयंपाकघर सुरू करण्यात आले असून, दिवसाला 5 हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्याची या स्वयंपाकघराची क्षमता आहे. या स्वयंपाकघरातून भविष्यात इस्पितळांतील रुग्ण व तुरुंगातील कैद्यांनाही आहार पुरवण्याची योजना आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.

‘अक्षयपात्र’चे देशातील 78 वे स्वयंपाकघर असून, ही सेवा देणारे ‘अक्षयपात्र’चे गोवा हे 18 वे राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या स्वयंपाकघरातून अक्षयपात्रचे जेवण साळगाव, कळंगुट व शिवोली येथील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे. माध्यान्ह आहार ही योजना ही आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागू आहे. मात्र, या स्वयंपाकघरातून चाचणी आधारावर कळंगुट, साळगाव व शिवोली या मतदारसंघांतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह आहार पुरवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साळगावात ही सुविधा उभारण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ‘अक्षयपात्र’चे स्वयंपाकघर लवकरच दक्षिण गोव्यात सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह आहार त्यांच्यातर्फे पुरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अक्षयपात्रबरोबरच राज्यातील स्वयंसेवी गटांतर्फे माध्यान्ह आहार पुरवणेही चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.