43 कोटींमध्ये मिळवा अमेरिकेचे नागरिकत्व

0
4

>> राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणली ‘गोल्ड कार्ड’ योजना

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती. भारतातील अवैध स्थलांतरितांना घेऊन तीन विमाने मायदेशी आली. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 43 कोटी रुपये भरून अमेरिकेचे ‘गोल्ड कार्ड’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ग्रीन कार्डची जागा आता गोल्ड कार्ड घेणार आहे.

आधीच्या ईबी-5 (ग्रीन कार्ड) योजनेची जागा आता गोल्ड कार्ड घेणार आहे. या माध्यमातून गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. गोल्ड कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यात जाहीर करू, असे ओव्हल ऑफिसमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले.

श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवेल, यात शंका नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले.

रशियन नागरिकांनाही गोल्ड कार्ड देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हो रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. आधीच्या ईबी-5 योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यवसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. 10 लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रीन कार्ड योजनेत द्यावे लागत होते.