>> संगीत क्षेत्रातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त
>> गोमंतक विभूषण पुरस्काराने सन्मानित
आपल्या धारदार आवाजात तडफदारपणे नाट्यपदे सादर करत रसिकांची वाहवा मिळविणारे प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक गोमंत विभूषण पं. प्रभाकर कारेकर (80) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दि. 12 फेब्रुवारी रोजी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून पंडित प्रभाकर कारेकर यकृताच्या आजाराने त्रस्त होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रभाकर कारेकर यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी काल अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पं. कारेकर यांचे शास्त्रीय संगीताचं शिक्षण पं. सुरेश हळदणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी. आर. व्यास यांच्याकडे झाले होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कित्येक होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्यांच्या नावावर अनेक गाजलेले अल्बम आहेत. त्यांनी संगीताच्या क्षेत्राशी संबंधित अनेक कार्यशाळा घेतल्या असून, अनेक देशांमध्ये होणाऱ्या परिषदांमध्ये सहभाग नोंदवला होता.
धारदार आवाज
पं. प्रभाकर कारेकर यांचा जन्म 1944 साली गोव्यात मडगाव येथे झाला होता. पण त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. हळदणकर, पं. अभिषेकी आणि पं. व्यास यांच्याकडे मुंबईत झाले होते. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. दमसास, पल्लेदार ताना, धारदार आवाजात तडफदारपणे नाट्यपदे सादर करत पं. कारेकर हे रसिकांची वाहवा मिळवत. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते आणि या माध्यमांवरील ते लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर एक अल्बम केला
होता.
पं. कारेकरांची गाजलेली गीते
पं. प्रभाकर कारेकर यांना एक आघाडीचे कलाकार आणि एक चांगले शिक्षक म्हणून ओळखले जात होते. गोवा येथे जन्मलेले पंडित कारेकर यांनी अनेक गाजलेली मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्याचप्रमाणे प्रिये पहा, शतजन्म शोधिताना, चंद्रिका ही जणू, नभ मेघांनी आक्रमिले अशी विविध नाट्यगीते प्रेक्षकांची दाद घेत होते.
कलासक्त व्यक्तीमत्व
पं. कारेकर हे कलासक्त व्यक्तिमत्व होते. मास्टर दीनानाथांच्या ढंगातील नाट्यपदेही ते विशेष तडफदारपणे सादर करत. प्रत्यक्ष रंगभूमीवर भूमिका न करताही, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात अफाट लोकप्रियता मिळालेले गायक म्हणून कारेकर प्रसिद्ध आहेत. पल्लेदार ताना आणि गायनातील रंजकता यांमुळे कारेकर आपल्या गायनाने रसिकांना तृप्त करतात. पं. कारेकर हे आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून, दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांत आणि आकाशवाणी संगीत संमेलनांत त्यांनी आपले गायन सादर केले. त्याचप्रमाणे त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, आखाती देश अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपले गायनाची भुरळ रसिकांना पाडली आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
पं. प्रभाकर कारेकर यांना त्यांच्या संगीत सेवेबद्दल विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. कारेकरांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमंतक विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.