आग आगल्याच्या अफवेमुळे घाबरून प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून मारल्या उड्या
जळगावमधील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना काल घडली. याशिवाय 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. न घडलेल्या घटनेच्या अफवेने क्षणात घात केला अन् अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने काही प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी बाजूने भरधाव निघालेल्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली ते चिरडले गेल्याने या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव-मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान काल दुपारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेस लखनऊहून मुंबईच्या दिशेने जात होती, तर कर्नाटक एक्सप्रेस बंगळुरूहून दिल्लीच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली होती.
पुष्पक एक्सप्रेस पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात, तशा ठिणग्या उडाल्या; मात्र, ते पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असे बोलल्यामुळे रेल्वेतील काही प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली. परिणामी भीतीने रेल्वेतून काही प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. दुर्दैवाने त्याचवेळी दुसऱ्या बाजूने बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू होण्याची ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 12 प्रवाशांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला, तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. रेल्वेच्या चाकांखाली प्रवाशी चिरडले गेल्याने घटनास्थळी छिनविछिन्न स्थितीत मृतदेह पडले होते. त्या स्थितीतील मृतदेह पाहून त्यांच्या प्रियजनांनी टाहो फोडला, हे दृश्य त्या ठिकाणी उपस्थित सर्वांचेच मन हेलावणारे होते.
या घटनेनंतर जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रेल्वे प्रशासनही घटनास्थळी पोहोचले असून, घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आले होते. तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यापूर्वी अफवेमुळे 23 प्रवाशांचा गेला होता बळी
राजधानी मुंबईत 2017 मध्ये प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर देखील अशाच अफेवतून मोठा अपघात झाला होता. रेल्वे स्थानकावरील पुलावरुन जात असताना कुणीतरी ‘फूल पडले’ असे म्हटले, अन् ‘पूल पडला…’ अशी अफवा पसरली. या अफवेनंतर स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी झाली अन् तब्बल 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती.
एकाच डब्यातील प्रवाशांनी मारल्या उड्डया
रेल्वेच्या एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, कानावर पडलेल्या दोन शब्दांची कुठलीही खात्री न करता, संयम न बाळगता, घाईघाईने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या अन् नाहक जीव गमावला. एका अफवेने घात केला अन् होत्याचे नव्हते झाले.
‘ते’ दोन शब्द ठरले घातकी
पथराडे रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्या. ते पाहून एका प्रवाशाने ‘आग लागली’ असे शब्द उच्चारल्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले.