अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्वाला प्रारंभ

0
2

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शपथ घेतली. त्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरू झाले आहे. त्यांच्यासोबत जेडी वेंस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्‌‍स यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री 10.30 वाजता शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. कारण अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमधील अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या शपथविधी सोहळ्याला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, टेस्ला कंपनीचे एलॉन मस्क, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासह 700 हून अधिक नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.

अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व राखू. त्यामुळे यापुढे जग आपला वापर करू शकणार नाही. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
आम्ही आमच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी जाहीर केले. याचबरोबर मेक्सिकोच्या दक्षिण सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य पाठवण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली.