सैफ खानला गंभीर दुखापत, लिलावती रुग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गुरुवारी (16 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एक दरोडेखोर शिरला. अभिनेत्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
दरोडेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमांचे घाव खोलवर असल्याने सैफ अलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोर सैफ अलीच्या घरात घुसला. सुरुवातीला त्याने घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. आरडाओरड झाल्यानंतर सैफ अली खान त्याच्या बेडरुममधून बाहेर आला. त्याने दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. सध्या सैफ अलीच्या घरात काम करणाऱ्या एक घरगुती नोकर, लिफ्ट ऑपरेटर आणि सुरक्षारक्षक यांना ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोराचे छायाचित्र
सैफ अली खानवर त्याच्या घरातच चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसला असून त्याचे छायाचित्रही जारी करण्यात आले आहे. हल्लेखोराने सैफच्या घरात काय केले याची मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ-करिनाच्या मुलांना सांभाळणाऱ्या दायीला ओलीस ठेवत तिच्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली होती, असे चौकशीत समोर आले आहे.