मार्क झुकेरबर्गच्या वक्तव्यावर ‘मेटा इंडिया’कडून माफीनामा

0
2

फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत 2024 मध्ये जगभरात झालेल्या निवडणुकांवर भाष्य केले होते. त्यामध्ये त्यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीचा उल्लेखही केला होता. कोविड व्यवस्थित न हाताळल्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची सरकारे निवडणुकांमध्ये कोसळली, असे विधान झुकेरबर्ग यांनी केले होते.
या दिशाभूल करणाऱ्या विधानासाठी संसद आणि भारतीय लोकांची माफी मागावी, अशी मागणी यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती. माफी न मागितल्यास कारवाईचा इशाराही दुबे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याबद्दल मेटाने बुधवारी भारताची माफी मागितली.

जो रोगन पॉडकास्टच्या एका भागात मार्क झुकेरबर्ग यांनी दावा केला होता की, कोविड-19 महामारीमुळे जगातील अनेक सरकारांवरचा लोकांचा विश्वास उडाला. त्यामुळे निवडणुकींमध्ये या सत्ताधाऱ्यांना सत्ता गमावावी लागली. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. झुकेरबर्ग यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
आता मेटा इंडियाने याबाबत माफी मागत प्रकरणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मार्क झुकेरबर्ग यांचे विधान अनेक देशांसाठी खरे असले तरी भारतासाठी लागू नव्हते, असे भारताची माफी मागताना मेटा कंपनीने म्हटले आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठकुराल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये झुकेरबर्ग यांच्या ‘अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल’ माफी मागितली. 2024 च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्क यांचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे; पण ते भारतासाठी लागू नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो, असे ठकुराल यांनी म्हटले आहे.