पीओके’शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण : केंद्रीय संरक्षणमंत्री सिंह

0
3

पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, पीओकेशिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. पीओके ही पाकिस्तानसाठी परकीय भूमी आहे आणि ते दहशतवाद पसरवण्यासाठी या भूमीचा वापर करत आहेत. पीओकेमध्ये दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात आहेत, असेही सिंह म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी 9व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. सशस्त्र दलांचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा 1953 मध्ये या दिवशी सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2016 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.
1965 मध्ये अखनूरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे सर्व प्रयत्न भारताने हाणून पाडले होते. आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्व युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या मुस्लीम बांधवांनी देखील दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, असेही ते म्हणाले. आजही भारतात घुसणारे 80 टक्क्या पेक्षा जास्त दहशतवादी पाकिस्तानातून येतात. सीमेपलीकडील दहशतवाद 1965 मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार युद्धात मिळालेल्या सामरिक फायद्यांचा लाभ उठवू शकले नाही, असा आरोपही त्यांनी केला.