दर्यासंगमावर शुक्रवारपासून लोकोत्सव

0
3

>> मंत्री गोविंद गावडेंची माहिती; 20 राज्यांतील कलाकार व हस्तकलाकार सहभागी होणार

कांपाल-पणजी येथील दर्यासंगमावर शुक्रवार दि. 17 जानेवारीपासून लोकोत्सव सुरू होणार असून, तो 26 जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती कला-संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकोत्सवाचे उद्घाटन होईल.

या उद्घाटन सोहळ्याला राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कला-संस्कृती खात्याचे मंत्री या नात्याने आपण स्वत:, तसेच पणजीचे महापौर रोहन मोन्सेरात हे व्यासपीठावर उपस्थित असतील, असे गावडे यांनी स्पष्ट केले.
लोकोत्सवात तब्बल 550 दुकाने (स्टॉल्स) असतील. तसेच 20 राज्यांतील कलाकार व हस्तकलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, काश्मीर, ओडिसा, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल आदी 20 राज्यांतील हे कलाकार व हस्तकलाकार असतील, असे गावडे यांनी सांगितले.

यंदाच्या लोकोत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा या महोत्सवात ‘आदिवासी हस्तकला ग्राम’ असेल, असे गोविंद गावडे म्हणाले. पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र व गोवा कला-संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध राज्यांतील लोककला पथकांना लोकोत्सवात आणण्यात येत असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
लोकोत्सवात गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, कलावृद्धी पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण होणार असून, पुरस्कार वितरण सोहळ्याला सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे हे उपस्थित राहणार आहेत, असे गावडे म्हणाले. दरवर्षी पणजीत होणारा ‘लोकोत्सव’ हा आता गोव्याचा एक ‘ब्रँड’ बनला असल्याचेही गावडे यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपाध्यक्ष अरविंद खुटकर हेही उपस्थित होते. समारोप सोहळा 26 जानेवारी रोजी होणार असून, त्यात सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय काढू : गावडे
पणजी ते मिरामार या दरम्यानच्या रस्त्यावर लोकोत्सवाच्या दिवसांत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. त्यामुळे कांपाल तसेच अन्य भागांतील लोकांचा हा महोत्सव दर्यासंगमावर आयोजित करण्यास विरोध आहे. ही बाब काल पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या नजरेत आणून दिली असता, कला आणि संस्कृती खात्याकडे कुणीही दर्यासंगमावर हा महोत्सव आयोजित करण्यास विरोध असल्याचे कळवलेले नाही. काही लोकांचा विरोध आहे म्हणून हा महोत्सव तेथून हलवता येणार नाही. मात्र, या महोत्सवामुळे लोकांना कसलाही त्रास होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असेही गावडे यांनी सांगितले.