>> नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणार; चित्ररथाचे 50 टक्के काम पूर्ण; 30 शिल्पकार, कारागीरांकडून निर्मिती सुरू
26 जानेवारी रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या गोवा राज्याच्या चित्ररथ निर्मितीचे काम दिल्लीतील राष्ट्रीय रंगशाळा कॅम्पमध्ये सध्या जोरात सुरू आहे. आतापर्यंत ह्या चित्ररथाचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचे चित्रण करणारा ‘स्वर्णिम भारत… वारसा आणि विकास’ या संकल्पनेवर चित्ररथ सादर होणार आहे.
फोंडा येथील सुप्रसिद्ध कलाकार सुशांत खेडेकर यांनी चित्ररथाची संकल्पना आणि रचना केली आहे. 26 डिसेंबर 2024 पासून राष्ट्रीय रंगशाळा कॅम्पमध्ये चित्ररथाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. सुशांत खेडेकर आणि पूर्णानंद पैदरकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील 30 शिल्पकार, कारागीर, फॅब्रिकेटर्स, सुतार आणि इतर लोकांची टीम 22 जानेवारीपर्यंत चित्ररथ तयार करण्यासाठी झटत आहेत.
यावर्षी गोवा राज्य ‘स्वर्णिम भारत…वारसा आणि विकास’ या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहे. गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे आणि प्रगतीचे चित्रण करणारा हा चित्ररथ असून, हा सर्व गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
26 जानेवारी 2025 रोजी दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित करण्यात येईल. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य आणि संघप्रदेशासह 15 चित्ररथांची, तसेच 10 मंत्रालये, विभागांच्या चित्ररथांची निवड केली आहे.
माहिती आणि प्रसिध्दी खात्याखाली प्रदर्शित होणारा गोवा चित्ररथ भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निवडण्यात आला आहे. संकल्पना, डिझाईन आणि व्हिज्युअल घटकांच्या विविध पैलूंचा विचार करून तज्ञ समितीने गोवा चित्ररथास मान्यता दिली आहे.
या वर्षी या चित्ररथासाठी संगीत डॉ. साईश देशपांडे यांनी दिले आहे आणि दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखाली नृत्य सादर करण्यात येईल. नृत्यदिग्दर्शन निषाद यांनी केले आहे, तर वेशभूषा संगीता खेडेकर आणि अवनी खेडेकर यांनी केली आहे.
कर्तव्य पथावरील संचलनानंतर 26 ते 31 जानेवारी या कालावधीत भारत पर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून इतर सहभागी राज्यांसह गोव्याचा चित्ररथ लाल किल्ल्यावर प्रदर्शित केला जाईल. या काळात संबंधित राज्यांतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.