वेर्णा ते नावेलीपर्यंच्या पश्चिम बगल रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे

0
3

>> डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीस खुला होण्याची शक्यता; मडगाव व अन्य भागांतील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

कित्येक वर्षांपासून रखडलेल्या वेर्णा ते बेले-नावेलीपर्यंच्या पश्चिम बगल रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून, संपूर्ण काम याच महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदाराला दिले आहेत. पथदीप आणि सिग्नलचे काम पुढील काही दिवसातं केले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा रस्ता वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.

3 किलोमीटरचा सुरावली, मुंगूल ते बाणावलीपर्यंतचा रस्ता स्टील्टवर उभारावा, अशी तेथील लोकांची मागणी होती. तो सखल भाग असल्याने पावसाळ्यात या पुलामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरांत भरून नुकसान होण्याची शक्यता लोकांनी वर्तवत आंदोलन केले होते. तसेच न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्र्यांकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यात काही सुधारणा केल्या.

गेली 20 वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्यालगत सुरावली व अन्य काही ठिकाणी रेल्वेमार्ग असल्याने तेथे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पश्चिम बगल रस्ता 11 किलोमीटर लांबीचा असून, तो वेर्णा येथे सुरू होतो आणि बेले-नावेली येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ला जोडला जातो. या रस्त्यामुळे गोवा ते कर्नाटकपर्यंतची वाहतूक जलदगतीने होईल. सध्या ही वाहतूक नुवेमार्गे मडगाव शहरातून जाते. हा रस्ता खुला झाल्यानंतर मडगाव शहरातून जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी मडगावातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटणार आहे.

हा रस्ता स्टील्टवर उभारावा म्हणून बाणावली येथील लोक आणि पर्यावरणवाद्यांनी हरित लवाद, जलस्रोत खाते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खात्याचे मंत्री आणि स्थानिक आमदारानी त्या भागाची पाहणी केली. त्यानंतर तेथील लोकांच्या मागणीनुसार काही सुधारणा केल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोवा-कर्नाटक अंतर कमी होणार
पश्चिम बगल रस्त्यामुळे गोवा-कर्नाटकदरम्यानचे कित्येक किलोमीटर अंतर कमी होईल. गोवा ते कर्नाटकपर्यंत जाणारी अवजड वाहतूक त्या मार्गाने सोडल्यास फातोर्डा, नुवे, मडगाव, नावेली येथे वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा होणार नाही.