ग्रामसभांमधून मेगा प्रकल्पांना वाढता विरोध

0
2

कुडचिऱ्यात कचरा प्रकल्पाविरोधात देवांना गाऱ्हाणे

थिवी, कुंकळ्येत प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

गोव्यात येऊ घातलेल्या व विशेष करून ग्रामीण गोव्यात होणार असलेल्या सरकारी व खासगी प्रकल्पांना आता स्थानिक लोकांकडून मोठा विरोध होऊ लागलेला आहे. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आता पुढे येऊ लागले आहेत. ग्रामीण गोव्यातील लोकजीवन, संस्कृती, गोव्याची अस्मिता व गोव्याचे शांत जीवन गावात मेगा प्रकल्प उभे राहिल्यास नष्ट होईल अशी भीती आता गोमंतकीयांना वाटू लागली आहे. शिवाय या मेगा प्रकल्पांत मोठ्या संख्येनेे परप्रांतीय आल्यास आपल्याच गोव्यात आपण अल्पसंख्य होऊ अशी भीती आता गोमंतकीयांना वाटू लागलेली आहे. त्यामुळे आता बहुतेक ठिकाणी या प्रकल्पांना विरोध होऊ लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कुंकळ्येत प्रकल्पाविरोधी ठराव
वेलिंग – प्रियोळ पंचायत क्षेत्रातील कुंकळये गावातील सर्वे क्रमांक 27 व 28 मध्ये होणाऱ्या मेगा प्रकल्पाला ग्रामस्थांनी रविवारच्या ग्रामसभेत तीव्र विरोध करण्याचा ठराव घेतला. इथे होणाऱ्या मेगा प्रकल्पाला स्थानिक लोक गेल्या काही दिवसांपासून विरोध दर्शवीत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल, नगर नियोजन खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे व अन्य संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहे. रविवारी सरपंच हर्षा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मेगा प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याचा ठराव घेतला. त्यावेळी पंचायत मंडळाने सुद्धा ग्रामस्थांना पाठींबा दिला आहे.

थिवीत विद्यापीठास विरोध
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाच्या मदतीने थिवी कोमुनिदादच्या डोंगराळ भागात वर्ल्ड पीस विश्वविद्यालय उभारणीसाठी जो प्रयत्न चालू आहे त्याला थिवी ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. याविषयी एक खास बैठक थिवी पंचायत सभागृहात झाली. यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर यांनीही या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांना पाठिंबा असल्याचे सांगितले. या भागात येणारी ही शैक्षणिक संस्था म्हणजे शिक्षणाच्या नावाने चाललेला एक महाघोटाळा असल्याचा आरोप यावेळी कांदोळकर यांनी केला. थिवी येथील कोमुनिदादच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या पुणेस्थित खासगी विद्यापीठ प्रकल्पाला ग्रामस्थांनी एकमताने विरोध केला. विद्यापीठाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रकल्प होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कुडचिऱ्यात कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्पास विरोध

कुडचिरे येथे 45 हजार चौरस मीटर जागेत होऊ घातलेल्या बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्पास रविवारी ग्रामस्थानी ग्रामसभेतून प्रखर विरोध केला.
गावाचे पर्यावरण, गावाचे जलस्त्रोत, नदी नाले यांचा विद्ध्वंस होणार असून कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हा प्रकल्प नको अशा प्रकारची ठाम व प्रखर भूमिका मांडताना सर्वांमध्ये या प्रकल्पाला विरोध कायम असल्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी देवतांना गावाचे रक्षण करा तसेच कोणत्याही प्रकारे प्रकल्प होता नये यासाठी गावाची एकजूट सर्वांनी राखवी अशाप्रकारचे गाऱ्हाणे घालण्यात आले. प्रकल्पाला विरोध करणारे घोषणा फलक घेऊन ग्रामस्थांनी मैदान ते सातेरी मंदिरपर्यंत चालत येऊन घोषणाबाजी केली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 12 जण कुडचिरे येथे सदर प्रकल्पासंदर्भात पूर्णपणे पोलीस बंदोबस्तात सर्वे केला होता.