महाराष्ट्रात भाजपच्या 99 उमेदवारांची नावे जाहीर

0
4

भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवार 71 आमदारांना पुन्हा उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून काल पहिली यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातूनच रिंगणात उतरणार असून चंद्रशेखर बावनकुळेही कामठी मतदारसंघातून रिंगणात आहेत. भाजप एकूण 154 ते 156 उमेदवारांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात पहिल्या यादीत आता भाजपने एकूण 99 उमेदवारांना संधी दिली आहे.

यामध्ये 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

भाजपच्या पहिल्या यादीतील 99 उमेदवारांमध्ये 13 महिला असून 71 आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली होती. पण त्यांचा पराभव झाला. आता त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबईतील 16 पैकी 13 आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. भाजपने 3 आमदारांची उमेदवारी रद्द करताना त्या आमदारांच्या जागी त्यांच्या घरातील सदस्यांनाच संधी दिली आहे.

महाविकास आघाडीची बैठक
दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र अद्याप कोणत्याच उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपावरुन काँग्रेस, ठाकरेसेनेत वाद झाल्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत याबाबतनिर्णय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपावरुन झालेले मतभेद बैठकीच्या केंद्रस्थानी होते. विदर्भातील 4 जागांवरुन काँग्रेस, ठाकरेसेनेत मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खरगे यांनी बैठक बोलावली होती.
मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत असून राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असे विधान संजय राऊतांनी केले त्यावर उद्धव ठाकरेंपेक्षा संजय राऊत हे मोठे नेते असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.