जम्मू-काश्मीरात आज मतदान

0
3

>> शेवटच्या टप्प्यात 415 उमेदवारांसह अफजल गुरूचा भाऊही रिंगणात

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यात मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी 7 जिल्ह्यांतील 40 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यामध्ये 39.18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

तिसऱ्या टप्प्यातील 40 जागांपैकी 24 जागा जम्मू विभागातील आणि 16 काश्मीर खोऱ्यातील आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या टप्प्यात 415 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामध्ये 387 पुरुष आणि 28 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अफझल गुरूचा मोठा भाऊ एजाज अहमद गुरू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एजाज गुरू हे सोपोर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात 169 उमेदवार कोट्यधीश असून, 67 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. नगरोटा, जम्मू येथील भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंह राणा यांच्याकडे सर्वाधिक 126 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
दरम्यान, 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के मतदान, तर 25 सप्टेंबर रोजी 57.31 टक्के मतदान झाले होते.