जानेवारीपासून नद्यांतील गाळ उपसणार : शिरोडकर

0
8

>> राज्यात पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना

राज्यातील काही नद्यांमध्ये गाळ साचलेला असल्याने या नद्यांतील पाणी लोकवस्तीत शिरुन पूर येत असतो याची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे येत्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत अशा नद्यांतील गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. साखळी येथील वाळवंटी नदीत गाळ भरुन राहिलेला असून, त्यामुळे नदीचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झालेले आहेत. परिणामी हे पाणी लोकवस्तीत येत असून या पुराचे पाणी निवासी घरे, दुकाने, विद्यालये तसेच मंदिरात घुसून नुकसान होत असल्याचे शेट यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या मार्च महिन्यात नद्यांचा गाळ उपसण्याचे काम हाती घेता अले नाही; मात्र आता येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हे काम हाती घेण्यात येणार आहे. नद्यांची पाहणी करुन या कामासाठीचा अंदाजे खर्च तयार करुन नंतर काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.