>> भाजपच्या गाभा बैठकीत सरकारला सल्ला
शनिवारी रात्री उशिरा भाजपच्या गाभा समितीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, महत्त्वाची विधेयके आणताना पक्षाला विश्वासात घ्या अशी सरकारला सूचना केली. पक्षाचे गोवा प्रभारी आशिष सूद यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधी आमदार आक्रमक भूमिका घेऊन सरकारला काही प्रश्नांवरून उघडे पाडत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यात विरोधी आमदारांनी त्रुटी दाखवल्याने गोवा औद्योगिक विकास (दुरूस्ती) विधेयक सरकारला मागे घ्यावे लागले होते. मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी विधेयक संमत करण्यात आले असले तरी या विधेयकातही विरोधकांनी त्रुटी दाखवल्या होत्या. त्या सरकारला दुरुस्त कराव्या लागल्या. अन्य खात्यांच्या काही वादग्रस्त विधेयकांबाबतही नाराजी व्यक्त केलेली आहे.
हर घर तिरंगा
पक्षातर्फे 15 ऑगस्टपूर्वी हर घर तिरंगा यात्रा आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांवर राष्ट्रध्वज लावावा असे यावेळी सांगण्यात आले.
भाजप इमारतीची पायाभरणी थाटात
राज्यात भाजप कार्यालयासाठीची जी इमारत उभारण्यात येणार आहे त्यासाठीचा पायाभरणी शुभारंभ थाटात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या सोहळ्याला पक्षाचे जुने कार्यकर्ते व राज्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी ज्या नेत्यांनी मोठे योगदान दिले ते नेते व अन्यांना मोठ्या संख्येने निमंत्रित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.