नेपाळमध्ये विमान कोसळले; 18 जणांचा मृत्यू

0
8

नेपाळची राजधानी काठमांडू येथे काल विमान कोसळले. त्यात विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते.
काल सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून ह्या विमानाने उड्डाण केले आणि काही क्षणातच ते कोसळले. 9एन-एएमई हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 17 जण हे सूर्या एअरलाइन्सचे तंत्रज्ञ होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते. पोखरा शहरात एका दुसऱ्या विमानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी या विमानातून तंत्रज्ञ जात होते.

विमान कोसळता क्षणीच तिथे उडालेला आगीचा भडका शमविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या ठिकाणाहून काळ्या धुराचे लोट उठले होते; मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने धावपट्टीच्या दक्षिणेकडून उड्डाण घेतले होते. अचानक त्याला धक्का बसला आणि आग लागली. यानंतर ते पूर्वेकडील बुद्ध एअर हँगर आणि रडार स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यामध्ये ते कोसळले.

मागच्या 14 वर्षांत 12 विमान अपघात
नेपाळमध्ये दरवर्षी सरासरी एक विमान अपघात होतो. 2010 पासून आतापर्यंत 12 विमाने नेपाळमध्ये कोसळली आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी काठमांडूपासून 205 किमी अंतरावर पोखरामध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते.