नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

0
11

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून, या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना काल रशियातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्‌‍यू द अपॉस्टल’ असे या पुरस्काराचे नाव असून, हा रशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या पुरस्काराने मोदी यांचा सन्मान केला.

हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानतो. तसेच हा पुरस्कार मी भारतीयांना समर्पित करतो. हा सन्मान फक्त माझा नाही तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

युद्ध नको; शांतता हवी : मोदी
या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काल व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. मोदी यांनी यावेळी शांतीचा संदेश दिला. युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत. त्यासाठी शांततेसाठी चर्चेची खूप जास्त गरज असते. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. कारण युद्ध हा अडचणींवरील उपाय नाही. मला शांततेची अपेक्षा आहे. मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.