उत्तर गोव्यातील कळंगुट, साळगाव या मतदारसंघांत सुमारे 10 एमएलडी पाण्याची कमतरता असून, पाणीटंचाईची ही समस्या येत्या डिसेंबरपर्यंत सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या एका आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.
उत्तर गोव्यातील साळगाव, कळंगुट या किनारी भागातील मतदारसंघांत सध्या 10 एमएलडी पाण्याची कमतरता आहे. या भागात नवीन हॉटेल, गेस्ट हाउस, फ्लॅट व इतर बांधकामांमध्ये वाढ होत आहे. तथापि, पाणीपुरवठ्यामध्ये वाढ होत नसल्याने व्यावसायिक व नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे आमदार लोबो यांनी सांगितले.
किनारी भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्याच्या कामाला दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. अंदाजे 19 कोटी रुपये खर्चून पिळर्ण – साळगाव येथे पंपिंग स्टेशन आणि पाणी साठवण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सदर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामाचा जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, अशी माहिती लोबो यांनी दिली.
जलस्रोत खात्याकडून पाणी उपलब्ध केल्यानंतर साबांखाकडून पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पुरविले जाणार आहे. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आणखी 20 ते 25 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊ शकते, असेही लोबो यांनी सांगितले.