शिवोली येथे बेकायदेशीररित्या जी वृक्षतोड करण्यात आली आहे, त्याची सविस्तर चौकशी करण्याचा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. आपल्या सूचनेनुसार ही झाडे तोडण्यात आलेली आहेत, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे सांगत असल्याचा एक व्हिडिओ काल न्यायालयापुढे ठेवण्यात आल्याने न्यायालयाने या प्रकरणी लोबो यांना देखील पक्षकार केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी निश्चित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाने वन खात्यावर ताशेरे ओढताना या वृक्षतोड प्रकरणी वन खात्याने कोणती चौकशी केली आहे, त्यासंबंधीची सगळी माहिती न्यायालयापुढे सादर करा, असा आदेश त्यांना दिला.