गगनयानच्या 4 अंतराळवीरांची नावे जाहीर

0
15

इस्रोच्या आगामी महत्वाकांक्षी मोहिमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. त्यामध्ये सुमारे 6 टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. चार अंतराळवीरांना सामावण्याची क्षमता या यानाची असेल. हे अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालेल. या यानातून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे काल पंतप्रधानांनी जाहीर केली. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी या अंतराळवीरांची नावे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केरळमध्ये इस्रोच्या तीन प्रमुख तांत्रिक विभागांचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचा दौरा केला. यावेळी मोदींनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गगनयान मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांची नावे जाहीर करत त्यांना पुढील तयारीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. बंगळुरू इथे या अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला मदत करणार आहे.

या आधी एप्रिल 1984 ला राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या ‘सोयूझ टी-11′ या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी म्हणून अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली.
असे असले तरी आत्तापर्यंत भारताने स्बळाबळावर भारतीय अंतराळवीर अकाशात पाठवला नव्हता. आता देशाचे हे चार अंतराळवीर 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला गगयनान मोहिमेतून अवकाश भ्रमंती करणार आहेत. स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजूनतरी शक्य झालेले नाही.