‘इग्नू’च्या संकुलासाठी 5 हजार चौ.मी. जागा देणार

0
14

>> मुख्यमंत्र्यांची घोषणा; इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) च्या गोव्यातील प्रादेशिक केंद्राला कायमस्वरूपी संकुल उभारण्यासाठी फर्मागुडी येथे 5 हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मुक्त विद्यापीठाच्या दोनापावल येथे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित 37 व्या दीक्षांत समारंभात बोलताना काल केली.

भारत सरकारने सुरू केलेल्या कौशल्य भारत कार्यक्रमाशी संबंधित प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम ऑफर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी इग्नूचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया, स्किल इंडिया आणि सर्वसमावेशक भारतावर भर दिला आहे. आजच्या तरुणांना उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सुसज्ज करावे लागत असल्याने प्रगत शिक्षण ही काळाची गरज आहे. मला आनंद आहे की इग्नू असे अनेक कोर्सेस ऑफर करत आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पणजी प्रादेशिक केंद्रांतर्गत डिसेंबर 2022 आणि जून 2023 सत्रांत परीक्षांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 1,363 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. देशभरात बहाल केलेल्या पदव्यांची संख्या 3,35,084 आहे. दिल्लीतील इग्नूच्या मुख्य संकुलात आयोजित दीक्षांत समारंभात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 39 हून अधिक प्रादेशिक केंद्रांनी काल देशभरात पदवीदान समारंभ आयोजित केला होता.