काँग्रेसची गोठवलेली खाती पुन्हा सुरू

0
9

काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवल्याचा आरोप केला. आम्हाला दोन दिवसांपूर्वी माहिती मिळाली की आम्ही जे धनादेश जारी करतोय, ते बँकांकडून मंजूर केले जात नाहीत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेसची खाती गोठवण्याचा नव्हे, तर लोकशाही गोठवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अजय माकन यांनी केला.

या पत्रकार परिषदेनंतर आयकर लवादाने शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता काँग्रेसची खाती गोठवण्यावरील बंदी उठवली. दरम्यान, आयकर विभागाने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांचा आयकर परतावा भरायला सांगितले आहे.
आयकर विभागाने 2018-19 च्या आयकर परताव्याच्या आधारे काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठवली आहेत. आयकर विभागाने या दोन खात्यांमधून 210 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत, असे अजय माकन यांनी सांगितले.

बुधवारपर्यंत खात्यांवरील बंदी उठवली
खाती गोठवल्यानंतर काँग्रेसने आयकर लवादाकडे धाव घेत याचिका दाखल केली. यावेळी ज्येष्ठ वकील विवेक तंखा यांनी बाजू मांडली. यानंतर येत्या बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आली. पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.