गोवा शिक्षण विकास महामंडळाच्या व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली असून, या योजनेखालील अर्ज प्रत्येक महिन्यात निकालात काढले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी या व्याजमुक्त कर्ज योजनेचे अर्ज येत्या 27 नोव्हेंबरपासून खुले करण्यात येणार असून, येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज वेबसाइटवरून डाऊनडोल केले जाऊ शकतात, अशी माहिती गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिली.
महागाईचा दर आणि शैक्षणिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. भारतात शिक्षण घेणाऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख रुपये आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी 10 लाखांवरून 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली आहे, असे पर्वतकर यांनी सांगितले.
जोपर्यंत कर्जदार परतफेडीच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करतो, तोपर्यंत कर्ज व्याजमुक्त असते. निर्धारित मुदतीनंतर कर्जाच्या हप्त्यांचा भरणा न केल्यास कर्ज रकमेवर 10 टक्के दंडात्मक व्याज लागू केले जाते.
किती मिळते कर्ज?
या कर्ज योजनेखाली भारतात अभ्यासासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी (एकूण 10 लाख) आणि परदेशातील शिक्षणासाठी 8 लाखांचे कर्ज जास्तीत जास्त 2 वर्षांसाठी (एकूण 16 लाख) दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर कर्जाची परतफेड सुरू होते.