गुळे येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

0
7

>> पेट्रोल पंपाच्या आवारातील घटना; संतप्त जमावाकडून नासधूस

काणकोण नगरपालिका क्षेत्रातील गुळे येथील श्री आर्यादुर्गा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांचा याच पंपावरील विहिरीत बुडून मृत्यू झाला. काल सायंकाळी 7.30 च्या दरम्यान ही घटना घडली. नोमी गावकर (43, रा. गुळे) आणि बारकेलो गावकर (40, रा. गोकुल्डे) अशी मृतांची नावे आहेत. मृत कासव विहिरीतून बाहेर काढण्यासाठी ते दोघेही विहिरीत उतरले होते. दरम्यान, दोघेही पट्टीचे पोहणारे होते, त्यामुळे त्यांचा ऑक्सिजनअभावी गुदरमरून मृत्यू झाला असावा, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या आवारात एक विहीर असून, त्याचा व्यास फारच कमी आहे. याच विहिरीत एक कासव मृत पावले होते. ते बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा एक जण उतरला, तो बुडत असल्याचे लक्षात येताच दुसऱ्या व्यक्तीने त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. विहिरीत उतरेल्या कामगारांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दोघांचाही गुदमरून अंत झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे; कारण दोन्ही व्यक्ती पट्टीचे पोहणारे होते.
या घटनेची माहिती मिळताच काणकोण अग्निशामक दलाने घटन स्थळी धाव घेऊन दोघांनाही बाहेर काढले, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.

या दुर्घटनेची माहिती मिळाच बळी गेलेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पेट्रोल पंपच्या मालकाला घटनास्थळी हजर करण्याची मागणी केली. जोपर्यंत मालक येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. यानंतर खवळलेल्या जमावाने आर्यादुर्गा पेट्रोल पंपच्या कार्यालयाची आणि पेट्रोल पंपाचीही नासधूस केली. त्यांना आवरणे काणकोण पोलिसांना कठीण झाले होते. त्यामुळे अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली होती.