अवघे जग आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहे. भारताच्या पुढाकारातून ज्याच्या माध्यमातून योग दिनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, त्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या मुख्यालयात आज स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ही देशासाठी गौरवशाली बाब आहे. भारत देश हा नेहमीच अवघ्या जगाच्या कल्याणाचा विचार करीत आला आहे. यंदाच्या योग दिनाचे बोधवाक्य देखील ‘योगाद्वारे वसुधैव कुटुंबकम्’ असेच आहे. सध्या भारताकडे जी – 20 देशांचे अध्यक्षपद आहे. त्याचे बोधवाक्यही ‘एक पृथ्वी – एक कुटुंब – एक भविष्य’ असे आहे. केवळ स्वतःपुरता संकुचित विचार न करता अवघ्या जगाचा विचार करणे ही आपली पूर्वापार संस्कृती आणि परंपरा राहिली आहे. प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी ही उदारता, ही व्यापकता, ही सहिष्णुता आपल्यामध्ये रुजवली. भारतावर अनेक आक्रमणे झाली, परंतु हा आक्रमकांचा देश कधीच नव्हता. आपण आपला विचार जगाच्या अनेक भागांत पोहोचवला, तोही तलवारीच्या जोरावर नव्हे, तर त्या लोकांची मने जिंकून. आपली धर्माची संकल्पनादेखील ‘रिलीजन’ पेक्षा कितीतरी व्यापक आणि नैतिकतेशी जोडलेली आहे. आपले वैदिक ज्ञान असो, योग असो, आयुर्वेद असो, ह्या सगळ्यामध्ये सदैव संपूर्ण मानवजातीचा विचार केला गेलेला दिसतो, मानवकल्याणाचा विचार केलेला दिसतो. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे. तो केवळ शरीरासाठी नाही. तो जेवढा शरीरासाठी आहे, तेवढाच मनासाठी आहे, तेवढाच बुद्धीसाठी आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा तो राजमार्ग आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त राहते आणि मन तंदुरुस्त असेल तर मानव मोठी बौद्धिक झेप घेऊ शकतो. ‘हेल्थ इज वेल्थ’ असे म्हणतात ते उगीच नव्हे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये तर सतत जाणता अजाणता आरोग्याची हेळसांड होत असते. त्यातून ताणतणाव, दडपण, नैराश्याने माणसे घेरली जातात. आजच्या नव्या पिढीची एकाग्रता भंग करण्यास मोबाईल कारणीभूत ठरला आहे. या साऱ्या पाषांतून, विळख्यांतून मुक्त करून शारीरिक मानसिक संतुलन मिळवून देण्यात योग, प्राणायाम, आसने महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच जेव्हा जागतिक पातळीवर ही प्राचीन विद्या नेण्याचा प्रयास झाला, तेव्हा तिचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघापुढे जेव्हा जागतिक योग दिनाचा प्रस्ताव मांडला गेला, तेव्हा 193 सदस्य देशांपैकी 175 देशांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला होता. आज जगातील 190 देश योग अनुसरताना दिसत आहेत. चीनसारख्या देशामध्येही आज योग अनुसरला जाताना दिसतो. ‘योग’ हा शब्दच मुळी ‘युज’ धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थच जोडणे असा आहे. आजच्या योगदिनाच्या कार्यक्रमात अंटार्क्टिकापासून संयुक्त राष्ट्र मुख्यालयापर्यंत, सुप्रिम कोर्टापासून तुरुंगापर्यंत, शाळांपासून विद्यापीठांपर्यंत, सफाई कामगारांपासून मंत्री आणि आमदारांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसणार आहे. भारत तर आज सागरापासून शिखरापर्यंत योगमय होऊन जाणार आहे. मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये होणार आहे. या सर्व सोहळ्याचे नुसतेच प्रेक्षक बनून राहण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये योग अनुसरण्याचा प्रयत्न जर प्रत्येकाने केला, तर त्याचा उदंड फायदा आपल्याला पुढील आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही.
महर्षि पतंजलींनी 195 योगसूत्रे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा अष्टांग योगामध्ये सूत्रबद्ध केली, जी आपल्या जीवनाची अष्टसूत्री बनली पाहिजे. आजच्या काळाच्या संदर्भात मोक्ष म्हणजे पारलौकिक ज्ञानप्राप्ती नव्हे. ऐहिक जीवन जगतानाच ते अधिकाधिक अर्थपूर्ण जगता येणे आणि त्यातून आपल्या समाजासाठी, देशासाठी काही देता येणे आणि त्यातून आपले नाव चिरंतन करून ठेवणे म्हणजेच खरा मोक्ष आहे असे मानायला हरकत नसावी. अन्यथा, नुसते जन्माला येणे, केवळ स्वतःपुरते पाहत थोडाफार प्रपंच करून निजधामाला निघून जाणे ह्या असल्या आयुष्याला अर्थ तो काय? अर्थपूर्ण जीवनाची आस जागवण्यासाठी मुळात शरीर, मन सचेतन करण्यासाठी योग पूरक ठरेल. प्राणायाम आपल्या शरीरामध्ये केवळ प्राणवायू खेळवणार नाही, देहामध्ये ती चेतनाही खेळवील. सहजसोपी आसने आपले शारीरिक आलस्य दूर करील. कपालभाती शरीराच्या सांदिकोपऱ्यांत दडून बसलेल्या वाईट गोष्टी बाहेर काढील. सूर्यनमस्कार एका नव्या तेजाने आपले जीवन उजळवील. योग ही सक्रिय, चैतन्यमय जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जसे जमेल, जेवढा जमेल तेवढा योग अनुसरूया.