मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मडगाव येथे प्रतिपादन
लोहिया मैदानावर शासनातर्फे क्रांतिदिन थाटात साजरा
डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून रोजी गोवा मुक्तीच्या अंतिम टप्प्याचे रणशिंग फुंकले व गोमंतकीयांच्या मनात क्रांतीची बीजे पेरली. त्यातून गोमंतकीयांनी एकजुटीने लढा दिल्याने गोवा मुक्त झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’चा नारा दिला असून आम्हाला विकसित गोवा करायचा आहे. आज आम्हांला तंत्रज्ञान व सौर ऊर्जेसारख्या क्षेत्रांत क्रांती करण्याची गरज असून आजपासून कामाला लागूया असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मडगाव येथील लोहिया मैदानावर गोवा क्रांतीदिन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास, तंत्रज्ञान व आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, आमदार उल्हास तुयेकर, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, डॉ. राम मनोहर लोहिया यांचे सुपूत्र रमेशचंद्र लोहिया, स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया व्यासपीठावर उपस्थित होते.
गोवा क्रातीदिन हा ऐतिहासिक दिवस असून राम मनोहर लोहियांनी याच मैदानावर ‘जयहिंद’ची घोषणा देवून क्रांती केली होती. गोव्यात पिंटोचे बंड, कुंकळ्ळी येथील लोकनायकांचा इतिहास, दिपाजी राणे यांचे बंड यांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला जाईल. तसेच कुंकळ्ळी येथील 1583 मध्ये झालेल्या बंडाचे स्मरण म्हणून दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर तेथे उपस्थित राहून लोकनायकांना मानवंदना देतील असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे या वर्षभरात तर राज्यातील हुतात्मा स्मारकांचे सरकार नूतनीकरण करणार आहे. हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून गोवा मुक्ती लढ्याचा माहितीपट तयार केला असून काल प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे. आत्मनिर्भर गोवा बनविण्यासाठी सरकारने विविध योजना चालीस लावल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गोवा क्रांती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. गोवा मुक्तीसाठी त्याग केल्याने हा सुदिन उगवला असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात राम मनोहर लोहियांचे सुपूत्र रमेशचंद्र लोहिया, गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गुरूदास कुंदे, रोहिदास देसाई, विष्णू आंगले, वामन प्रभुगावकर व ॲलिडिओ कॉश्ता यांचा मुख्यमंत्र्यांहस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. लोहिया फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेले ‘द स्ट्रगल फॉर सिव्हिल लिबर्टी’ या लोहिया लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अभिजीत रंजनसिंग उपस्थित होते.
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मंत्री, आमदार, स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्मा स्मारक व लोहियांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन अनील पै यांनी केले. सुरवातीस मडगावातील विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. त्यानंतर माहिती पट दाखविण्यात आला. तीन विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली.
लोहिया यांचे पुत्र कार्यक्रमाला उपस्थित
या कार्यक्रमात राम मनोहर लोहियांचे सुपूत्र रमेशचंद्र लोहिया, गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गुरूदास कुंदे, रोहिदास देसाई, विष्णू आंगले, वामन प्रभुगावकर व ॲलिडिओ कॉश्ता यांचा मुख्यमंत्र्यांहस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. लोहिया फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेले ‘द स्ट्रगल फॉर सिव्हिल लिबर्टी’ या लोहिया लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अभिजीत रंजनसिंग उपस्थित होते.