अवकाळी पाऊस आणि आजार

0
14
  • डॉ. मनाली महेश पवार

या अवकाळी पावसामुळे बाह्य तापमान 50-20 डिग्री अंशाने कमी होते व अचानक वातावरणात गारवा येतो. त्याचप्रमाणे परत सूर्यदेव अचानक संतप्त होतो व बाह्य वातावरणातील उष्णतेचे तापमान एकाएकी वाढते. सतत बदलत जाणाऱ्या हवामानामुळे मानव शरीरावर फार चटकन परिणाम होतो. याचवेळी विविध असात्मज, संसर्गजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. मात्र योग्य अशा ऋतुचर्या-दिनचर्येचे पालन केल्यास आपल्याला आजारांचा संसर्गसुद्धा होऊ शकत नाही.

मे महिन्याची सुट्टी लागल्याने बाल-गोपालांसह वृद्धांपर्यंत सगळेच आनंदित आहेत. धरणीमाता जरी तप्त झाली, सूर्यदेवता जरी संतप्त झाली तरी निसर्गदेवता मात्र उदार होऊन मौसमी फळांनी मानवजातीचा हा उकाड्याचा त्रास शमवत होतीच. कैरीचे पन्हे, कोकमचे सरबत, आवळ्याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, ताक, छाछ इत्यादीने शरीराची तहान भागत होती. आंबे, फणस, जांभुळ, करवंदे इत्यादी फळे मनाला तृप्त करत होतीच, त्याचप्रमाणे टरबूज, खरबूज, द्राक्षे, डाळिंब इत्यादी शरीर-मनाला सुखावत होतीच. काकडी तर उन्हाळ्यात निसर्गाने दिलेले एक वरदानच. या सर्वांमुळे संतप्त झालेल्या सूर्याचा त्रास शरीर सात्म्य होऊन सुसह्य होतो न होतो तोच अवकाळी पावसाने थोडेफार आपले अंग दाखवले.

या अवकाळी पावसामुळे बाह्य तापमान 50-20 डिग्री अंशाने कमी होते व अचानक वातावरणात गारवा येतो. त्याचप्रमाणे परत सूर्यदेव अचानक संतप्त होतो व बाह्य वातावरणातील उष्णतेचे तापमान एकाएकी वाढते. सतत बदलत जाणाऱ्या हवामानामुळे मानव शरीरावर फार चटकन परिणाम होतो. याचवेळी विविध असात्मज, संसर्गजन्य आजार उद्भवण्याची, वर्षा ऋतू सुरू होण्याची ही पहिली घंटा आहे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे प्रत्येक ऋतूचा साधारण दोन महिन्यांचा कालावधी असतो. तरीसुद्धा ऋतू सुरू झाल्याची लक्षणे जसजशी बाह्य वातावरणात दिसायला सुरुवात होतील, तसतसा एक ऋतू संपून दुसरा सुरू होत आहे हे जाणावे. नुसते कॅलेंडरनुसार ऋतू ठरवू नयेत, तर निसर्गात होणारे बदल पाहून त्यानुसार राहण्यात, खाण्या-पिण्यात, व्यायामात व वागण्यात बदल करावे. ज्याप्रमाणे ऋतू क्रमशः बदलत जातो, त्याप्रमाणे ऋतुचर्येतील बदलही सावकाश, क्रमाक्रमानेच करावेत. अचानक एका दिवसात हे बदल करू नयेत. पूर्वीच्या ऋतुमानातील वातावरणाचे शरीरास थोडेफार सात्म्य झालेले असते. यावेळी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. म्हणजेच उन्हाळ्यात योग्य असलेला आहार पुढे पावसाळ्यात कदाचित अपथ्यकर असू शकतो. तसेच अवकाशी पाऊस पडल्यास लगेच आहार-विहारामध्ये बदल न करता, क्रमाक्रमाने बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. दमट वातावरणात वातदोष वाढीस लागतो व तप्त उष्णतेमुळे पित्तदोष साठण्यास सुरुवात होते. त्यामुळे अग्नी मंद होतो व पचनाचे आजार होतात. गढूळ पाण्यामुळे जंतुसंसर्गजन्य आजार वाढीस लागतात.

  • अवकाळी पावसामुळे होणारे आजार
  • अवकाळी पावसामुळे श्वसनमार्गाचे, पचनसंस्थेचे तसेच जंतुसंसर्गाचे आजार चटकन वाढीस लागतात.
  • सर्दी, खोकला, दम्याचा त्रास, ताप असे श्वसनसंस्थेचे आजार साथीसारखे पसरतात.
  • भूक न लागणे, उलट्या, जुलाब, पोट फुगणे, जंत, कावीळसारखे पचनसंस्थेचे आजारही बळावतात.
  • डेंग्यू, मलेरिया, स्वायनफ्लू, कोरोना इत्यादीसारखे जंतुसंसर्गजन्य आजारही पसरू लागतात.
  • थकवा, निरुत्साहसारखे मानस आजारही काही प्रमाणात दिसतात.
  • नॉर्मल सर्दी म्हणजेच इन्फ्लूएंजाचा त्रास अवकाळी पावसामुळे सर्वाधिक जाणवतो. अचानक होणाऱ्या बदलामुळे संसर्गजन्य विषाणू श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला संसर्ग करून नाक आणि घशावर परिणाम करतात. त्यामुळे नाक बंद होणे, घसा खवखवणे, खोकला, ताप आदी लक्षणे दिसू लागतात.
  • अतिसार हा आजार अचानक पाऊस पडल्याने लगेचच उद्भवण्याची शक्यताही जास्त असते. हा आजार बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. पोटात पेटके उठतात व सोबत जुलाब सुरू होतात.
  • बदलत्या ऋतूमुळे अन्नातून विषबाधा होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पोटात पेटके येणे, मळमळणे, उलट्या होणे, जुलाब व अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात.
  • त्वचेची ॲलजी ः ओलाव्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे त्वचेवर दाद, खाज सुटणे, पुरळ येणे, नखांचे संक्रमण यांसारख्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका असतो.
  • या काळात डासांचा प्रादूर्भावही भरपूर प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम म्हणून मलेरिया, चिकुनगुनिया, स्वायनफ्लूसारखे आजार उद्भवतात.

कसे असावे या काळात आचरण?

  • सर्वांगास नेहमी तेल लावावे. तेल शक्यतो तिळाचे असावे. गरम भांड्यावर तेलाची वाटी ठेवून ते गरम करावे व पूर्ण अंगाला लावावे. छातीत कफ झाला आहे असे वाटत असल्यास त्या तेलात थोडेसे मीठ घालावे व ते तेल छातीला लावावे म्हणजे छातीतील कफ सुटून छाती मोकळी होते.
  • तेल लावल्यावर गरम पाण्याने आंघोळ करावी किंवा बाष्पस्वेद घ्यावा.
  • वैद्याच्या सल्ल्याने वातशामक तेलाचा एनिमा घ्यावा.
  • जुलाब होत असल्यास व आमावस्था असल्यास उपेक्षा किंवा अनुलोमक द्रव्यांचा उपयोग केल्यानंतर दीपन, पाचन, ग्राही औषधांचा उपयोग करावा. संजीवनी गुटी हा आमावस्थेत उपयोगी पडणारा, दीपन-पाचन करणारा एक महत्त्वाचा कल्प आहे. या अवस्थेत द्रव व लघु भोजन घ्यावे. यासाठी गोड ताजे ताक, यवागू व यूषसारखे पदार्थ वापरावेत. मुस्तासिद्ध जल पिण्यासाठी वापरावे. जास्त जुलाब होऊन दुर्बलता येत असल्यास कुटजासारखे स्तंभन द्रव्य वापरावे व अनुपानासाठी ताक घ्यावे.
  • उलट्या होत असल्यास चमचाभर आले व लिंबाचा रस घ्यावा. साळी लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळिंबाचा रस खडीसाखर टाकून थोडा-थोडा पीत राहावा व लंघन करावे.
  • सर्दी, घसा दुखणे, तापासारखे वाटणे असा त्रास होत असल्यास तुळस, अडुळशाचे पिकलेले पान, कांदा, लवंग, मिरे, दालचिनी घालून तयार केलेला काढा दिवसातून दोन वेळा सलग एक आठवडा घ्यावा.
  • हळदीचे दूध प्यावे.
  • गूळवेल सत्त्व चिमूटभर दोन-दोन तासांनी घ्यावे. साधारण तीन दिवस सेवन करावे.
  • ज्येष्ठमधाचे चूर्ण पाव चमचा मधातून दर तीन तासांनी सेवन केल्यास सर्दी, दमा, ताप यांसारखी लक्षणेही बरी होतात.
  • सीतोपलादीचूर्ण गरम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे. लहान मुलांंना पाव चमचा सीतोपलादी चूर्ण दुधातून किंवा तुपातून द्यावे.
  • खोकला, दमा असणाऱ्यांनी वसावलेह सकाळ-संध्याकाळ चाटून खावा.
  • पोट फुगल्यासारखे वाटणे, गॅस होणे, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण जेवणाच्या सुरुवातीला पहिल्या दोन भाताच्या घासांत तुपाबरोबर मिसळून घ्यावे.
  • सकाळी अनशापोटी आले-लिंबाचा रस घ्यावा.
  • मलावरोध, मूळव्याधाचा त्रास उद्भवल्यास अविपत्तिकर चूर्ण/वटीसारखे मृदुविरेचक घ्यावे.
  • संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत.
  • आहार सेवनामध्ये काही बदल
  • ताजे, गरम आणि हलके (पचायला हलके) अन्न सेवन करावे.
  • पचायला जड व तेलकट पदार्थ टाळावेत. दही, चीज, पनीर किंवा मिठाया टाळाव्यात. फास्ट फूड, जंक फूड, रेडी यू यूज फूड अजिबात खाऊ नये.
  • दुपारी साधे जेवण जेवून रात्री मुगाचे कढण, रव्याची पातळ लापशी, भाज्यांचे सूप असा द्रवाहार करावा.
  • या काळात विविध संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता वाढत असल्याने बाहेरील तसेच उघड्यावरच्या खाद्य-पेयांचा वापर करू नये.
  • आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स टाळावेत.
  • मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी भाजी, आमटी बनवताना हिंग, जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद अशा मसाल्यांचा वापर करावा.
  • भाज्या, आमटी किंवा सूप करतानाही तिखटांपेक्षा आले किंवा सुंठीचाच वापर करावा.
  • दुधात चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकावे.
    आहाराची पथ्ये पाळल्यास औषधांची गरजच राहत नाही. योग्य आहार घेतला नाही तर औषधांचा पुरेसा परिणाम दिसून येत नाही. अशा काळात आहाराचे पथ्य कटाक्षाने पाळणे आवश्यक ठरते.
  • या काळात कसे वागावे?
  • पाऊस हा सध्या कसाही व केव्हाही येऊ शकतो, त्यामुळे काम नसताना शक्यतो बाहेर पडू नका.
  • बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट अवश्य जवळ बाळगा. पावसात मात्र अजिबात भिजू नका.
  • दमट हवा एकंदरित जंतुपोषक व त्यामुळे विविध प्रकारच्या इन्फेक्शनना कारण ठरत असल्याने सकाळ-संध्याकाळ हवा शुद्ध करण्यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची सुकवलेली पाने, धूप आदी घालून धूपन करावे.
  • शारीरिक श्रमांचा अतिरेक करू नये. पण साधा व कमी प्रमाणात घरातल्या घरात व्यायाम करावा.
  • रात्री जागरण करू नये, तसेच दुपारी झोपू नये.
  • हवेत गारवा व शरीरातही वातदोष वाढत असल्याने कोमट पाण्यानेच स्नान करावे. साबणाऐवजी उटण्याचा उपयोग करावा.
  • तसेच पिण्यासाठी पाणी वापरताना ते पाणी निवळून, गाळून व उकळून मगच वापरावे. शुद्ध केलेले पाणी न वापरता तसेच पाणी सेवन केल्यास अनेक साथींच्या आजारांना निमंत्रण मिळेल. तसेच दमटपणा, गारवा, संतप्तपणा या सगळ्यांचा लपंडाव हा सारखा आता सुरूच राहणार, त्यामुळे फ्रीजमधील थंड पेय, पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.
    या अशा अवकाळी पावसाची सध्या कोकण प्रांतात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा पाऊस योग्य काळजी न घेतल्यास वर सांगितल्याप्रमाणे बरेच आजार पसरवू शकतो. आयुर्वेदशास्त्रात याच काळाला ‘ऋतुसंधी’ म्हटलेले आहे. संपणाऱ्या ऋतूचा शेवटचा सप्ताह व सुरू होणाऱ्या ऋतूचा पहिला सप्ताह अशा 14 दिवसांच्या मधल्या कालावधीला ‘ऋतुसंधी’ म्हणतात. या काळात सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. कारण शरीराला बाह्य वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायचे असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार हितकर आहार-विहाराकडे लक्ष द्यावे व आचरण करावे. योग्य अशा ऋतुचर्या-दिनचर्येचे पालन केल्यास आपल्याला आजारांचा संसर्गसुद्धा होऊ शकत नाही.