आनंदी देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानी

0
22

पाक, चीन, बांगलादेश भारताच्याही पुढे; अफगाणिस्तान तळाशी; फिनलँड सर्वांत आनंदी देश

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी काल जाहीर करण्यात आली. त्यामध्ये फिनलँड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलँड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. 137 देशांच्या यादीत सर्वात तळाशी अफगाणिस्तान आहे. या यादीत भारत 125 व्या स्थानी असून, पाकिस्तान, नेपाळ, चीन आणि बांगलादेश यासारखे लगतचे देश भारताच्याही पुढे आहेत.

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार हा अहवाल गॅलप वर्ल्ड पोलच्या आधारे तयार करण्यात आला आहे. मात्र हा अहवाल आशियाई देशांसाठी निराशाजनक आहे. टॉप 20 आनंदी देशांच्या यादीत एकाही आशियाई देशाचा समावेश नाही.

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार या यादीत पहिल्या क्रमांकावर फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड, चौथ्या क्रमांकावर इस्रायल, पाचव्या क्रमांकावर नेदरलँड, सहाव्या क्रमांकावर स्वीडन, सातव्या क्रमांकावर नॉर्वे, सातव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे. तसेच आठव्या क्रमांकावर लक्झेंबर्ग, नवव्या क्रमांकावर न्यूझीलंड, 10व्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, 12व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, 13व्या क्रमांकावर कॅनडा, 14व्या क्रमांकावर आयर्लंड, 15व्या क्रमांकावर अमेरिका, 16व्या क्रमांकावर जर्मनी, 17व्या क्रमांकावर बेल्जियम, 18 व्या क्रमांकावर झेक प्रजासत्ताक, 19 व्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आणि 20 व्या क्रमांकावर लिथुआनिया आहे.

पाकिस्तान 103 व्या क्रमांकावर
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत दिवाळखोरीला गेलेल्या पाकिस्तानने भारताला खूप मागे सोडले आहे. या यादीत पाकिस्तान 103 व्या क्रमांकावर आहे, तर भारत 125 व्या स्थानावर आहे. बांगलादेश 118 व्या स्थानावर, चीन 82 व्या, तर नेपाळ 85 व्या स्थानावर आहे.

कशाच्या आधारावर ठरते क्रमवारी?
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी बनवताना वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टने या देशांतील लोकांची जीवनशैली, त्यांचा जीडीपी, सामाजिक आधार, अत्यल्प भ्रष्टाचार आणि एकमेकांप्रती असलेली प्रेमाची भावना यांचा आधार घेतला आहे. या आधारावर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टने यावेळीही फिनलँडला आपल्या क्रमवारीत शीर्षस्थानी ठेवले आहे. मात्र या अहवालाच्या तळाशी नजर टाकल्यास अफगाणिस्तान 137व्या क्रमांकावर आहे.