>>५० लाखांपर्यंत गृहकर्ज मिळणे शक्य; मोबाईल, नेट बँकिंग सेवा मार्च २०२३ पर्यंत सुरू
गोवा राज्य सहकारी बँकेने मोबाईल आणि नेट बँकिंग सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, येत्या ३१ मार्च २०२३ पर्यत ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. तसेच, बँकेला ५० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्यास मान्यता मिळाली असून, नाबार्डच्या मान्यतेनंतर सुमारे ७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची मुभा मिळणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्य सहकारी बँकेची मोबाईल, नेट बँकिंग या डिजिटल सेवा नसल्याने खातेदारांची गैरसोय होत आहे. परिणामी बँकेकडे युवावर्ग सुध्दा जास्त प्रमाणात आकर्षित होत नाही. त्यामुळे बँकेने आधुनिकतेची कास धरण्याचा निर्णय घेतला असून, बँकेची डिजिटल सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. बँकेशी राज्यातील शेतकरी वर्ग जोडलेला आहे. या शेतकर्यांना ग्रामीण भागात बँकिंग सुविधा देण्यासाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन मोबाईल व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मोबाईल व्हॅनमध्ये एटीएम सेवा आणि बँकिंग काउंटरची सुविधा सुध्दा उपलब्ध करण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शेतकरी, खातेदार हे शाखा नसलेल्या ग्रामीण भागात सुध्दा बँकेच्या सुविधेचा लाभ घेत आहेत. आणखीन दोन मोबाईल व्हॅन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इंटरनेटची सुविधा नसल्याने काही वेळा मोबाईल व्हॅनमधून आर्थिक व्यवहार करणे कठीण होत आहे. त्यावर उपाय आखण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा झाली असून, आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये सुमारे ६.९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेचे नुकसान १०० टक्के कमी करण्यास यश प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी बँकेची आर्थिक स्थिती बिकट बनली होती. तथापि, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या प्रयत्नामुळे बँक पुन्हा एकदा सुस्थितीत आली आहे. बँकेला चालू आर्थिक वर्षात मागील सहा महिन्यांत बँकेला सुमारे ३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बँकेच्या ठेवी २,१६,११५.२६ लाख कोटी एवढ्या असून, सुमारे १,१४,००१.८८ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मागील वर्षात सुमारे ३,३०,११७.१४ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करण्यात आली आहे. बँकेला एकूण नफा २० कोटी रुपये एवढा झाला आहे. बँकेचा आजचा एनपीए ४.२६ टक्के एवढा आहे. खाण व्यावसायिकांच्या कर्जाचे सुमारे ४५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात आले आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
गृहकर्ज मर्यादेत आणखी वाढ शक्य : फळदेसाई
यापूर्वी बँकेला २५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्यास मान्यता होती. आता, ५० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्यास मान्यता मिळाली आहे. नाबार्डकडून मान्यता मिळाल्यानंतर गृहकर्जाच्या मर्यादेत ७५ लाखांपर्यंत वाढ होऊ शकते. या गृहकर्जासाठी बांधकामासंबंधीची कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत, असेही फळदेसाई यांनी सांगितले.