>> गुन्हा अन्वेषण विभागाची हैदराबादमध्ये कारवाई
>> हैदराबाद-गोवा ड्रग्ज तस्करीचा तपास सुरू
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अखेर हैदराबाद – गोवा अमलीपदार्थ तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला असून हैदराबादमधील सिध्दीपेट जिल्ह्यातील महेश गौड याला अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली आहे.
हैदराबाद पोलिसांनी गोवा हैदराबाद अमलीपदार्थ प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आता गोवा पोलिसांनीसुद्धा हैदराबाद गोवा अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने उत्तर गोव्यातील शिवोली येथे छापा घालून अमलीपदार्थ प्रकरणी हैदराबाद येथील यशवंत रेड्डी नामक युवकाला अटक केली होती. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले होते.
सदर युवक हैदराबाद येथून अमलीपदार्थ आणून त्याची उत्तर गोव्यातील किनारी भागात विक्री करत असल्याची माहिती उघड झाली होती. सदर युवकाने काही अमलीपदार्थ तस्करांची नावेही उघड केली. या अमलीपदार्थ तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे रवाना झाले होते.
गोव्यातील काही व्यक्ती हैदराबाद भागात अमलीपदार्थ पुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून किनारी भागातील शॅक, हॉटेल मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली. त्याप्रमाणे हैदराबाद येथील काही व्यक्ती गोव्यातील किनारी भागात अमलीपदार्थाचा पुरवठा करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. गोवा पोलिसांकडून अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने काही दिवसापूर्वी कळंगुट येथे छापा टाकून आंध्रप्रदेशातील दोन विद्यार्थ्यांना अमलीपदार्थप्रकरणी अटक केली होती.
यावेळी त्यांच्याकडून सुमारे ७० हजार रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. सदर विद्यार्थी भाड्याच्या खोलीत राहून अमलीपदार्थांची तस्करी करीत असल्याचे उघड झाले होते.