>> देशभरातून ९५०० मतदारांनी बजावला अधिकार; भारत जोडो यात्रेच्या शिबिरातही मतदान; उद्या निकाल जाहीर होणार
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची ऐतिहासिक निवडणूक काल पार पडली. तब्बल २४ वर्षानंतर आता कॉंग्रेसला गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि खासदार शशी थरुर अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांच्यासह ५० मतदारांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान शिबिरातून मतदान केले. देशातून एकूण ९९०० मतदारांपैकी ९५०० मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, याचा निकाल लागणार आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया देशभरात राबवण्यात आली. काल सकाळी १० वाजता मतदानाला सुरुवात झाली. दिल्लीतील मुख्यालयात सर्वप्रथम पी. चिदंबरम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर कॉंग्रेसचे महासचिव जयराम रमेश, अजय माकन, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, अशोक गेहलोत आणि इतर नेत्यांनी मतदान केले. तसेच कालच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही मतदान केले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ९९०० मतदारांपैकी ९५०० मतदारांनी मतदान केले. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांनी अनुक्रमे कर्नाटक आणि केरळ या आपापल्या राज्यात मतदान केले.
देशभरातील मतदानानंतर सीलबंद मतपेट्या मंगळवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील. बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिका एकत्र केल्या जातील. त्यानंतर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविणार्या उमेदवाराची कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाईल.
६५ मतदान केंद्रे
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली कॉंग्रेस मुख्यालयासह देशभरात ६५ हून अधिक मतदान केंद्र तयार करण्यात आली होते. त्यात प्रदेश कॉंग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींनी मतदान केले. हे प्रतिनिधी दर पाच वर्षांनी पक्षांतर्गत निवडले जातात.
२४ वर्षांनंतर मतदान
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी २४ वर्षांनंतर काल मतदान झाले. देशभरातील प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पीसीसी) कार्यालयात ९५०० प्रतिनिधींनी (मतदार) मतदान केले. यापूर्वी १९९८ मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात झालेल्या निवडणुकीत मतदान झाले होते. त्यावेळी सोनिया गांधींना सुमारे ७,४४८ मते मिळाली, तर जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मते पडली होती. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर पक्षात कधीही अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती.
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी केले मतदान
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेमध्ये असून, त्यांनी बेल्लारी-कर्नाटक येथील शिबिरातून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्रतिनिधींसाठी कंटेनरमध्ये खास मतदान केंद्र उभारण्यात आले होते. राहुल गांधी यांच्यासोबत इतर ५० मतदारांनी देखील येथूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
कॉंग्रेसचे भवितव्य कार्यकर्ते ठरवतील. कॉंग्रेसमध्ये परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. मतदानाआधी आपण खर्गे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. निकाल काहीही लागला, तरी आम्ही मित्र कायम राहणार आहोत.
- शशी थरूर, उमेदवार.
हा पक्षाच्या अंतर्गत निवडीचा भाग आहे. ही मैत्रीपूर्ण लढत असून, आम्हाला एकत्रच पक्षाचे काम करायचे आहे. थरूर यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या.
- मल्लिकार्जुन खर्गे, उमेदवार.
गोव्यात ३१ पैकी २९ सदस्यांचे मतदान
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत गोवा कॉंग्रेस समितीतील ३१ सदस्यांपैकी २९ सदस्यांनी मतदान केले. दोन सदस्य गोव्याबाहेर असल्याने ते मतदान करू शकले नाहीत, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने दिली.
पणजीतील कॉंग्रेसच्या कार्यालयात काल सकाळी १० वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सर्वांत प्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अन्य मतदारांनी मतदान केले.
यावेळी निर्वाचन अधिकारी व सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून अनुक्रमे मोहन जोशी व तन्वीर खान यांनी काम पाहिले. यावेळी त्यांना उपाध्यक्ष व निवडणूक एम. के. शेख यांनी सहाय्य केले.
मतदानानंतर मतपेट्या रात्री नवी दिल्लीकडे रवाना करण्यात आल्या. नवी दिल्लीतील कॉंग्रेसच्या मुख्यालयात बुधवार दि. १९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.