धनंजय चंद्रचूड नवे सरन्यायाधीश

0
14

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून काल नियुक्ती केली. न्यायमूर्ती चंद्रचूड ९ नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून, ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.

हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. त्यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. ते सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.