काटेरी मार्ग

0
29

तब्बल २२ वर्षांनंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या महिन्यात होणार आहे. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या दबावामुळेच गांधी घराण्यापुढे पक्षावरील स्वतःची पकड सोडण्यास भाग पाडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे हे उघड आहे. अन्यथा, आजवर भोवतालच्या होयबा संस्कृतीत रममाण झाल्यामुळे राजकीय पक्षाची संघटनात्मक निवडणूक वगैरे घेण्याची आवश्यकता असते ह्याचा सोईस्कर विसर त्यांना पडलेला होता. सोनिया गांधींचे अनारोग्य, पुत्र राहुल गांधी यांचा नकार आणि कन्या प्रियंका गांधी यांच्यावरील रॉबर्ट वड्रासंदर्भातील विविध प्रकरणांची टांगती तलवार यामुळे प्रथमच गांधी घराणेतर व्यक्तीची पक्षाध्यक्षपदी निवड होण्याजोगी ही परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. अर्थात, राहुल गांधींनी आपली नकारघंटा सोडावी आणि पक्षाची धुरा स्वीकारावी ही आग्रही मागणी अजूनही ठिकठिकाणाहून होतेच आहे. एकीकडे राहुल स्वतः पाच महिन्यांच्या प्रदीर्घ ‘भारत जोडो’ यात्रेवर असले तरी राज्याराज्यांतून प्रदेश कॉंग्रेस संघटना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे असे ठराव करीत सुटल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसतील तरच हे पद गांधी घराणेतर व्यक्तीकडे जाईल हेही एव्हाना स्पष्ट झालेले आहे.
गांधी घराणेतर व्यक्तींदरम्यान पक्षाध्यक्षपदासाठी अशी निवडणूक झाली तर सोनिया गांधी त्यापासून अलिप्त राहतील हे त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि थिरुवनंतपुरमचे खासदार आणि विचारवंत शशी थरूर अशी दोन नावे अध्यक्षपदासाठी उघडपणे पुढे आलेली आहेत. शशी थरूर यांची लेखक, विचारवंत म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती जरी असली, तरी गांधी घराण्याविरुद्ध आवाज उठवणार्‍या २३ नेत्यांमध्ये तेही होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे गांधी घराणेतर नेत्यांत निवडणूक झाली तर सध्या अशोक गेहलोत यांचेच पारडे जड दिसते.
अर्थात, गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडायचे नाही. सोडायचे नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ते आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेले तरुण तुर्क सचिन पायलट यांच्याकडे सहजतेने सोपवायचे नाही. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक आपण लढविली तरी राजस्थानचे मुख्यमंत्रिपदही स्वतःपाशी ठेवण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वी बोलून दाखवला होता. पण राहुल गांधी यांनी त्यांना उदयपूरच्या चिंतन शिबिरातील ‘एक व्यक्ती एक पद’ च्या पक्षाच्या धोरणाची आठवण करून दिल्याने गेहलोत यांना त्यापुढे मान तुकवणे भाग पडले आहे. लोकसभेची निवडणूक व्हायची आहे, राजस्थानातही निवडणूक होणार आहे. अशा वेळी आपण मुख्यमंत्रिपद सोडणे पक्षहिताचे ठरणार नाही वगैरे सबबी त्यांनी आजवर सांगून पाहिल्या, परंतु राहुल यांच्या त्या एका वाक्याने त्यांच्या त्या पवित्र्यावर पाणी ओतले. आपली कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड झाली तर आपल्या जागी कोणाला मुख्यमंत्री करायचे त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे आता गेहलोत सांगू लागलेले दिसतात.
पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आणि तो पक्षनेत्यांना सदैव उपलब्ध असायला हवा ह्या पक्षातील बंडखोरांच्या प्रमुख मागण्या राहिल्या आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी राहून गेहलोत यांना हे शक्य होणारे नाही. ते पक्षातील जुनेजाणते नेते आहेत. राजकारण कोळून प्यालेले आहेत. त्यामुळे गेल्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांनी केलेले बंड त्यांनी लीलया मोडून काढून स्वतःची त्या पदावर वर्णी लावली होती. त्यामुळे आता कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तरी ते सुखासुखी सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानची सूत्रे सोपवतील का हे पाहावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत बहुतेक ज्येष्ठतम कॉंग्रेस नेते पक्ष सोडून निघून गेलेले असल्याने अशोक गेहलोत यांच्या नावाभोवती जरूर वलय निर्माण झालेले आहे. त्याचे मुख्य कारण देशभरात कॉंग्रेसची धूळधाण होत असताना त्यांनी राजस्थानात कॉंग्रेस टिकवली हे आहे. आता देशात कॉंग्रेसचे अस्तित्व हे ७४ वर्षीय नेते टिकवू शकतील का हे पाहायचे आहे. त्यांचा अध्यक्षपदापर्यंतचा मार्गही काटेरीच आहे.
मुळात पक्षाध्यक्षपद गांधी घराण्याच्या हातातून निसटू द्यायची वेळ जसजशी जवळ येऊन ठेपते आहे, तसतसा गांधी घराण्याच्या हातातून ते निसटू नये याचा आग्रहही वाढत जाणार आहे. तसे झाले तर सोनियांकडेच नामधारी पक्षाध्यक्षपद ठेवण्याचा व कार्यकारी अध्यक्ष म्हणून गेहलोत यांची वर्णी लावण्याचा किंवा गेहलोत यांना अध्यक्षपद देऊन राहुल यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा प्रयत्न होईल. गांधी घराणे आपल्यावरील पक्षाचे संरक्षक कवच खरेच असे सहजासहजी सोडून देईल?