>> सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर मोदींचे प्रतिपादन
गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्सवे म्हणजेच राजपथ आजपासून इतिहासाचा विषय बनला आहे. देशाने आज आणखी एका गुलामगिरीची ओळख मिटवली आहे. वसाहतवादाच्या आणखी एका प्रतीकातून बाहेर पडल्याबद्दल मी देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. हा भारताच्या लोकशाही भूतकाळाचा जिवंत मार्ग आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासीयांचे मी मनापासून स्वागत करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल गुरूवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजपथचे नाव बदलून त्याचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केल्यामुळे आता तो ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २८ फुटी पुतळ्याचेही अनावरण केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४७ च्या आधी अंदमानवर तिरंगा फडकवला होता आणि त्यावेळी लाल किल्यावर तिरंगा फडकवण्याचे स्वप्न पाहिले होते. नेताजींच्या पुतळ्यामुळे देशाला प्रेरणा मिळेल. आम्ही आता गुलामीची ओळख मिटवली असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मोदी यांनी, गेल्या आठ वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवणारे ते ‘अखंड भारत’चे पहिले प्रमुख होते. आज इंडिया गेटजवळ आपले राष्ट्रीय महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. गुलामगिरीच्या वेळी ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताचे जीवनही प्रस्थापित केले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
सुभाषचंद्र बोस यांच्या
पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेट येथे स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २३ जानेवारी रोजी पराक्रम दिनी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण याच ठिकाणी करण्यात आले होते. आता या ठिकाणी २८ फूट उंचीचा ग्रॅनाईटचा पुतळा बसवण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा म्हणजे, नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाला श्रद्धांजली आणि राष्ट्राच्या त्यांच्या ऋणाचे प्रतीक असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.
नेताजींचा पुतळा अरुण योगीराज यांनी बनवला आहे. त्यांनी तयार केलेला २८ फूट उंचीचा पुतळा एकाच ग्रॅनाइट दगडात कोरलेला असून त्याचे वजन सुमारे ६५ मेट्रिक टन आहे.