>> पणजी पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले
>> विकीविरोधात विविध ३३ गुन्ह्यांची नोंद
उत्तर गोवा जिल्हा पोलीस आणि नवी मुंबई गुन्हा शाखेने संयुक्तपणे कारवाई करून नवी मुंबई भागातील ३३ गुन्ह्यात सहभागी असलेला, महाराष्ट्र पोलिसांनी मोक्का लागू केलेल्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगार विक्रांत दत्तात्रय देशमुख ऊर्फ विकी याला देशी बनावटीच्या बंदुकीसह शनिवारी मध्यरात्री पणजी पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या धाडसाने अटक केली. कुविख्यात गुंड विक्रांत देशमुख याच्याविरोधात शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रांत याला अटक केल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना देण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबईतील पोलीस पथक दाखल होणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
नवी मुंबईतील गुन्हेगार विकीविरोधात खून, दरोडे, खंडणी, मारामारी आदी प्रकरणात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विक्रांत आणि त्याच्या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून मोक्का अंतर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली जात आहे. त्यामुळे ते फरारी झाले. विक्रांतच्या पाळतीवर नवी मुंबईतील गुन्हा शाखा होती. नवी मुंबईच्या गुन्हा शाखेने उत्तर गोवा जिल्हा पोलिसांना विक्रांत गोव्यात येत असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर उत्तर गोवा पोलीस सतर्क झाले.
कॅसिनोबाहेर उपस्थिती
पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कॅसिनोच्या बाहेर पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री विक्रांत कॅसिनोच्या बाहेर दिसून येताच पोलिसांनी त्याला हटकले. असता त्याने पळून जाण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी बराच वेळ विक्रांत याचा थरारक पाठलाग करून अखेर त्याला ताब्यात घेतले.
पिस्तूल व काडतुसे
यावेळी विक्रांत याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली. सुदैवाने त्याने पोलिसावर गोळीबार केला नाही. त्याच्याजवळ पाच जिवंत काडतुसे आढळली. ळून आली आहेत. तसेच त्याचा मोबाईल फोन आणि टोयोटा फॉर्च्युन कारगाडी जप्त करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक सक्सेना यांनी सांगितले.
विक्रांत गोव्यात शुक्रवारी दाखल होऊन कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये राहिला होता. शनिवारी रात्री कारमधून पणजीतील जुन्या सचिवालयाजवळील तरंगत्या कॅसिनोमध्ये जाण्याच्या बेतात होता. विक्रांतसोबत असलेला त्याचा साथीदार मात्र पोलिसांच्या कारवाईच्या वेळी पळून गेला. या कारवाईमध्ये पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक पालेकर यांच्याबरोबर उपनिरीक्षक मयूर पणशीकर, हवालदार नितीन गावकर, आदित्य म्हार्दोळकर, मनोज पेडणेकर, परेश बुगडे, रामा घाडी यांनी सहभाग घेतला, अशी माहिती पोलीस अधीक्षक सक्सेना यांनी यावेळी दिली.